राजू चव्हाण/ खेड
कोरोनाच्या संकटापासून गेल्या दीड वर्षापासून बंद करण्यात आलेल्या 4 नियमित रेल्वेगाडय़ा गणेशोत्सवात विशेष गाडय़ा म्हणून कोकण मार्गावर धावणार आहेत. दिवा-रत्नागिरी, रत्नागिरी-मडगाव, सावंतवाडी-मडगाव, दिवा-सावंतवाडी या नियमित गाडय़ांचा समावेश आहे. यातील दोन पॅसेंजर्स गाडय़ांना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला असून चारही गाडय़ा पूर्णपणे आरक्षित आहेत.
गतवर्षी 22 मार्चपासून कोकण मार्गावरील दादर-रत्नागिरी व दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडय़ांना ब्रेक लागला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या दोन पॅसेंजर्स गाडय़ांना एक्स्प्रेसचा दर्जा देत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिव्यापर्यंतच धावणार आहे. प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही गाडी पूर्णपणे आरक्षित आहे.
दिवा-रत्नागिरी स्पेशल 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नियमितपणे धावेल. दिवा येथून सायंकाळी 3.30 वाजता सुटून रात्री 12.20 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरी येथून पहाटे 5.30 वा. सुटून त्याचदिवशी 1.25 वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाडीला पनवेल, आपटा, जिते, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, आंजणी, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली, कडवई, संगमेश्वर, उक्षी, भोके आदी थांबे देण्यात आले आहेत.
दिवा-सावंतवाडी स्पेशल 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. दिवा येथून सकाळी 6.55 वाजता सुटणारी ही गाडी त्याचदिवशी सायंकाळी 6.55 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून सकाळी 8.20 वाजता सुटून रात्री 8.10 वाजता दिवा येथे पोहोचेल. 16 डब्यांच्या या गाडीला कोकण मार्गावर सर्वच स्थानकांत थांबे देण्यात आल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी-मडगाव स्पेशल 6 ते 29 सप्टेंबरदरम्यान धावेल. रत्नागिरी येथून मध्यरात्री 1.40 वाजता सुटून सकाळी 8.50 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी 7.40 वाजता मडगाव येथून सुटून मध्यरात्री 1 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. या एक्स्प्रेसला राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरे, पेडणे, थिविम, करमाळी, वेरणा आदी थांबे देण्यात आले आहेत.
मडगाव-सावंतवाडी एक्स्प्रेस 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीत धावेल. मडगाव येथून दररोज सकाळी 6.25 वाजता सुटून 8.15 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून सायंकाळी 7 वाजता सुटून रात्री 9.30 वाजता मडगावला पोहोचेल. 16 डब्यांच्या या गाडीला सुरावली, माजोर्डा, वेरणा, करमाळी, थिविम, पेडणे, मडुरे आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
सावंतवाडी-दिवा गाडीला एक्स्प्रेसप्रमाणे चालवावी
गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणवासियांच्या महत्वाच्या गाडय़ा चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. पॅसेंजर्सच्या एक्स्प्रेस केल्यामुळे कोकण रेल्वेने सावंतवाडी-दिवा गाडीच्या प्रवास वेळेत कपात करून तिला एक्स्प्रेसप्रमाणे चालवावी. लांबचा प्रवास असल्याने शक्य असल्यास एक स्लिपर व एक थ्री टायर एसी असे आणखी दोन डबे जोडावेत.