ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच मुंबई महापालिकेने संकटात असलेल्या मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र या जाहिरातींसाठी प्रशासनाने नियमावली बनवली असून, तिचे काटेकोर पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मागील वषीपासून सार्वजनिक मंडळांना मिळणारी वर्गणी आटली आहे. मंडळांच्या प्रायोजकांनीही आखडता हात घेतला आहे. त्यात मागील वषी पालिकेने व्यावसायिक जाहिरातींना बंदी घातली. त्यामुळे उत्सव आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आला आहे. यावर व्यावसायिक आणि आरोग्य विषयक जाहिराती घेण्यास मंडळांना आडकाठी आणू नये, असा आग्रह नुकत्याच पालिकेसोबत झालेल्या बैठकीत मंडळांनी धरला होता. त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिकेने याबाबत 11 ऑगस्ट, 2021 रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात व्यावसायिक जाहिरातींच्या परवानगीची माहिती देण्यात आली आहे.
यासोबतच मंडपांच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरपर्यंतच्या अंतरात जाहिराती प्रदर्शित करण्यास 101 रुपये तसेच शंभर मीटरबाहेर प्रवेशद्वार जाहिरातीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारून परवानगी दिली जाणार आहे. (फक्त एका प्रवेशद्वारावर जाहिरात करता येईल.) रस्ते, फूटपाथवर जाहिरातीसाठी मनाई करण्यात आली आहे. मंडपाच्या आतील जाहिरातीसाठी सरसकट 125 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मैदानांमधील मंडप शुल्कात कपातपालिकेची उद्याने आणि मैदानात आयोजित केल्या जाणाऱया गणेशोत्सव मंडपांच्या परवानगी शुल्कात देखील मोठी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी हजारो रुपयांपर्यंत असलेल्या या शुल्कासाठी आता फक्त शंभर रुपये आकारले जाणार आहे. मंडपांचा आकार 500 चौरस फुटांपेक्षा जास्त नसावा. उद्याने, मैदानांमध्ये सन 2012पूर्वीपासून जी मंडळे उत्सव साजरे करतात, त्याच मंडळांना मंडप परवानगी दिली जाणार आहे. खासगी जमिनीवर पालिकेच्या धोरणानुसार शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाच्या 12 ऑगस्ट, 2021 रोजीच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
अशी आहे नियमावली :
- गुटखा, तंबाखू, दारू उत्पादनाची जाहिरात करता येणार नाही.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि नागरिक संदेश लावणे बंधनकारक आहे.
- प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूस ’भक्तांचे हार्दिक स्वागत’ व उजव्या आणि डाव्या बाजूला व्यावसायिक जाहिराती करता येतील.
- सिनेमा, दूरचित्रवाणी मालिकांच्या जाहिरातींमध्ये अश्लील जाहिरातींस प्रतिबंध
- जाहिरातींमुळे पदपथावरील पादचाऱयांना व रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.