साईराज, गणेश ज्वेलर्स, विश्रृत, आनंद संघ उपांत्य फेरीत
प्रतिनिधी / बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात गणेश ज्वेलर्स हुबळी संघाने मिलन वॉरियर्सचा 33 धावानी तर विश्रृत स्ट्रायकरने दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबचा 2 गडय़ाने पराभव केला. साईराज वॉरियर्स, आनंद चॅलेंजर्स, विश्रृत स्ट्रायकर्स व गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अष्टपैलू ओमकार वेर्णेकर व मध्यमगती गोलंदाज रोहित ढवळे यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात 9 गडी बाद 150 धावा केल्या, ओमकार वेर्णेकरने 1 षटकार 6 चौकारासह 44 चेंडुत 50, वेंकटेश शिराळकरने 6 चौकारासह 31 तर सफल शेट्टीने 4 चौकारासह 28 धावा केल्या. मिलन वॉरियर्स हुबळीतर्फे शुभम कांबळेने 22 धावात 3, सुदर्शन भावीकट्टीने 23 धावात 3 तर ओम रूपचंदानी व साहिल पारिश्वाड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल मिलन वॉरियर्सने 23 षटकात 9 गडी बाद 117 धावाच केल्या. आदित्य एन. एम. ने 2 चौकारासह 20, सुदर्शन भाविकट्टीने 22 तर ओम रूपचंदानीने 17 धावा केल्या. गणेश ज्वेलर्सतर्फे गणेश उमाजीने 12 धावात 2, ओमकार वेर्णेकरने 17 धावात 2 तर सफल शेट्टीने 20 धावात दोन गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात दैवज्ञ स्पोर्टस् संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्वबाद 87 धावाच केल्या. त्यात अखिलेश वेर्णेकरने एकाकी लढत देत 5 चौकारासह 40 धावा केल्या. त्याव्यतीरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. विश्रृत स्ट्रायकरतर्फे साईश बडवाण्णाचेने 11 धावात 3, शिवम गावडाने 8 धावात 2 तर रोहित ढवळेने 24 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल विश्रृत स्ट्रायकरने 17.2 षटकात 8 गडी बाद 88 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला. रोहित ढवळेने 4 चौकारासह नाबाद 23 तर हार्दिक काटने ने 3 चौकारासह नाबाद 22 धावा केल्या. या जोडीने 8 व्या गडय़ासाठी नाबाद 51 धावांची भागीदारीमुळे विश्रृत स्ट्रायकरने हा सामना 2 गडय़ांनी जिंकला. दैवज्ञतर्फे तुषार चौगुलेने 30 धावात 3, आदर्श हिरेमठने 8 धावात 2 तर स्वयं अप्पण्णावरने 14 धावात 2 गडी बाद केले.
आज स्पर्धेची साखळी फेरी संपली, साईराज वॉरियर्स, विश्रृत स्टायकर्स, गणेश ज्वेलर्स, हुबळी टायगर्स व आनंद चॅलेंजर्स संघांनी गुणांच्या आधारे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे लँड डेव्हलपर्स आशिष नलवडे, समर्थ पाटील, स्पर्धा सचिव परशराम पाटील यांच्या हस्ते ओमकार वेर्णेकरला तर लँड डेव्हलपर्स प्रकाश पाटील, नरेश गोदवानी, समाजसेवक नागेश देसाई यांच्या हस्ते रोहित ढवळे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आजचे उपांत्य फेरीचे सामने
1) साईराज वॉरियर्स वि. गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स यांच्यात सकाळी 9.20 वा. 2) विश्रृत स्ट्रायकर्स वि. आनंद चॅलेंजर यांच्या दुपारी 1.30 वा.