प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत, बोर्ड ऑफ पॅरेन्ट्स फॉर क्रिकेट इन बेळगाव आयोजित युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स आणि विश्रृत स्ट्रायकर्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात केली. अनिष भुसद (गणेश ज्वेलर्स-हुबळी) व सिद्धार्थ गोधवाणी (विश्रृत स्ट्रायकर्स) सामनावीराचे मानकरी ठरले.
आजच्या खेळाचे वैशिष्टय़ म्हणजे अनिष भुसद, अकिलेश वेर्णेकर, आदित्य एम. एम. व दीपक राक्षे यांनी झळकविलेली शानदार अर्धशतके तसेच सिद्धार्थ गोधवाणी आणि दीपक राक्षे यांनी चौथ्या गडय़ासाठी केलेली (104) नाबाद शतकी भागीदारी हे होय.
सकाळच्या सत्रात खेळविण्यात आलेल्या सामन्यात गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाने दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबविरुद्ध खेळताना 24 षटकात 187 धावा जमविल्या. केदार उसुलकरने 30, सफल शेट्टीने 16, अनिष भुसदने सुरेख फलंदाजी करताना 7 चौकार 1 षटकारासह 53, आदर्श हिरेमठने 14 धावा काढल्या. दैवज्ञतर्फे तुषार चौगुलेने 27 धावात 3, सय्यम अपण्णावरने 25 धावात 2 तर अमेय अडकुरकर व आदर्श कडेमणी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करण्यात यश मिळविले. त्यानंतर दैवज्ञ स्पोर्टस् संघाने 7 गडी गमावून 150 धावाच जमविल्या.
अकिलेश वेर्णेकरने 7 चौकारासह 50, अमेय अडकुरकरने 27, तुषार चौगुलेने 24 तर आदर्श कडेमणीने 19 धावा काढल्या. गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्सतर्फे फिरकी गोलंदाज ओमकार वेर्णेकरने 24 धावात 2 तर आदर्श हिरेमठ, चिन्मय साठे व ऋषीकेश राजपूत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रमुख पाहुणे राजू अलकुंटी, डॉ. केतन कार्लेकर, परशराम पाटील यांच्याहस्ते अनिष भुसद (गणेश ज्वेलर्स) याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दुपारच्या सत्रातील सामन्यात विश्रृत स्ट्रायकर्स संघाने मिलन वॉरियर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. मिलन वॉरियर्स संघाने 24 षटकात 8 गडी गमावून 150 धावा जमविल्या. आदित्य एम एमने 6 चौकार, 1 षटकारासह 50, नागदीप हनगलने 36, ओम रूपचंदानीने 28 धावा काढल्या. विश्रृततर्फे फिरकी गोलंदाज सिद्धार्थ गोधवानीने 28 धावात 3, रोहित ढवळेने 31 धावात 3, दीपक राक्षे व हार्दिक काटनेने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
त्यानंतर विश्रृत स्ट्रायकर्स संघाने 19.5 षटकात केवळ 3 गडी गमावून सामना 7 गडी राखून जिंकला. दीपक राक्षेने विजयी चौकार मारून 152 धावावर सामना संपवला. कर्णधार दीपक राक्षे व सिद्धार्थ गोधवाणी या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 104 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. दीपकने 6 चौकार, 2 षटकारासह नाबाद 63, सिद्धार्थने नाबाद 36 धावांची खेळी केली. ओम पाटीलने 32 धावा काढल्या.
मिलन वॉरियर्सतर्फे साईल परिशवाड व सुदर्शन भावीकट्टीने प्रत्येकी 1 गाडी बाद केला. प्रमुख पाहुणे इसाक निपाणी, सिफान कलईगार व जयसिंह राजपूत यांच्या हस्ते अष्टपैलू खेळी केलेल्या सिद्धार्थ गोधवाणीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आजचे सामने : 1) दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब वि. आनंद चॅलेंजर्स, स. 9.20 वा., 2) साईराज वॉरियर्स वि. गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स दु. 1.30 वा.