प्रतिनिधी/ वास्को
हेडलॅण्ड सडय़ावरील गणेश बेन्झोप्लास्टच्या इंधन टाक्या हटवण्याच्या मागणीवर भर दिला जात असतानाच आणि त्या टाक्यांच्या असुरक्षीततेचा प्रश्न उपस्थित करून त्यातील नाफ्ता खाली करण्याची मागणी न्यायालयातही केली गेली असताना गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने या आस्थापनाला त्या टाक्यांमध्ये ज्वालाग्रही इंधन साठवण्यासाठी ना हरकत दाखला बहाल केला आहे. गणेश बॅन्झोप्लास्ट मागच्या दोन महिन्यांपासून कन्सेंट टू ओपरेटसाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे याचना करीत होते. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.
हेडलॅण्ड सडा जेटी भागातील खडकाळ जमीनीवर व लोकवस्तीपासून अवघ्या काही अंतरावर गणेश बॅन्झोप्लास्ट या खासगी आस्थापनाच्या इंधन टाक्या असून साधारण पंधरा वर्षांपूर्वी या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, या टाक्या उभारण्याच्या क्षणापासून त्यांना स्थानिकांचा विरोध होत आलेला आहे. प्रारंभी या टाक्यांमध्ये खाद्य तेल साठवण्यात येईल असे भासवून लोकांचा विरोध थंड करण्यात आला होता. मात्र, नंतर या टाक्यांमध्ये केरोसिनपासून अन्य विविध प्रकारचे ज्वालाग्रही द्रव्य पदार्थ साठवण्यात येऊ लागले. या इंधन साठवणुकीसाठी मुरगाव बंदरातून थेट या टाक्यांना भुमीगत वाहिनी जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे मुरगाव बंदरात दाखल होणाऱया बऱयाच जहाजातील इंधन या टाक्यांमध्ये साठवले जात होते. मात्र, जसे जसे दिवस जात राहिले तसा स्थानिक लोक आणि नेत्यांचाही विरोध मावळत गेला. मागच्या पंधरा वर्षात या टाक्यां काही वेळा वापराविनाही राहिलेल्या आहेत. मध्यंतरी स्थानिक लोकांनी या टाक्यांच्या विस्ताराला विरोध केला होता. त्यानंतर सारे काही शांत झाले होते.
नु शी नलीनीमुळेच गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्या पुन्हा चर्चेत
परंतु मुरगाव बंदरात दाखल झालेल्या नु शी नलीनी या नाफ्तावाहू जहाजामुळे हेडलॅड सडा जेटी भागातील गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्या पुन्हा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. नु शी नलीनीतील सुमारे अडिच हजार मॅट्रीक टन नाफ्ता या टाक्यांमध्ये साठवला जाणार अशी हवा प्रारंभीच पसरली होती. अखेर ती खरी ठरली. त्याला स्थानिक मंत्री मिलिंद नाईक व त्यांच्या समर्थकांनी विरोध केला. मात्र, एमपीटी आणि सरकारने या विरोधाची पर्वा केली नाही. त्यामुळेच या टाक्यांचा प्रश्न न्यायालयात पोहाचलेला आहे. आता वास्को मुरगावात नाफ्ताचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. मात्र, गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. या टाक्या हटवण्यासाठी आता आंदोलन करण्यात येईल असे चार स्थानिक नगरसेवकांनी जाहीररीत्या घोषीत केलेले आहे. मात्र, याच विरोधाच्या पाश्वभूमीवर गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने गणेश बॅन्झोप्लास्ट आस्थापनाला इंधन साठवण्याच्या व्यवसायाला हिरवा कंदील दाखवणारा ना हरकत दाखला पुरवला आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीवीना नाफ्ता साठवणुक
हेडलॅण्ड सडय़ावरील गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्या जुन्या आहेत. त्या बरीच वर्षे विनावापर होत्या. त्या टाक्यांची किंवा या टाक्यांना जोडलेल्या वाहिन्यांची कधी तपासणी किंवा देखभाल करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीतील या टाक्या लोकवस्तीला अगदी जवळ असून त्यात नाफ्ता साठवण्यात आल्यास लोकांचा जीव धोक्यात येईल असे स्पष्ट करून मंत्री मिलिंद नाईक व त्यांच्या समर्थकांनी त्या टाक्यांमध्ये नाफ्ता साठवणुकीला विरोध केला होता. पुढे नाफ्ता खाली करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहोचल्याने या टाक्यांच्या असुरक्षीततेचा प्रश्न न्यायालयातही उपस्थित झाला होता. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान गणेश बॅन्झोप्लास्टला त्या टाक्यांमध्ये इंधन साठवणुकीसाठी गोवा राज्य प्रदुषण मंडळाने दिलेला ना हरकत दाखल्याचा कालावधी केव्हाच संपलेला असल्याचे व एमपीटीने त्या टाक्यांमध्ये साठवलेला नाफ्ता हा बेकायदा प्रकार असल्याचेही उघडकीस आले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दाखल्याची पर्वा न करताच त्या टाक्यांमध्ये अडिच हजार मॅट्रीक टन नाफ्ता पंधरा दिवसांपर्यंत साठवण्यात आला होता हे स्पष्ट झाले होते.
अखेर गणेश बॅन्झोप्लास्टला प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी
उपलब्ध माहितीनुसार गणेश बॅन्झोप्लास्टने दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा व्यवसाय करण्याच्या परवानगीसाठी म्हणजेच ‘कन्सेंट टू ओपरेट’ साठी गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र, प्रदुषण नियंत्रण मंडळाने त्यांना ही परवानगी दिली नव्हती. ही माहिती न्यायालयात उघड झाल्यानंतरच साधारण चार दिवसांपूर्वीच गणेश बॅन्झोप्लास्टला पुन्हा इंधन साठवण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे स्थानिक लोक आणि नेत्यांचा विरोध असला तरी कायदय़ाच्या दृष्टीने गणेश बॅन्झोप्लास्ट आता या टाक्यांमध्ये इंधन साठवण्यासाठी मोकळे झाले आहे. पुढील दोन वर्षांसाठी या आस्थापनाला ही परवानगी देण्यात आलेली आहे.
कोणत्या आधारावर पुन्हा परवानगी दिली याचे स्पष्टीकरण मागणार
हेडलॅण्ड सडय़ावर गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्यांमध्ये इंधन साठवण्यासाठी विरोध होत असताना आणि त्या टाक्या हटवण्याची मागणी करण्यात आलेली असताना राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने या आस्थापनाला त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करून त्यांना पुन्हा व्यवसायाला परवानगी दिल्याने मंत्री मिलिंद नाईक यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. यासंबंधी मंत्री मिलिंद नाईक यांचे समर्थक नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नाफ्ता साठवणुकीच्या प्रश्नासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती तो नाफ्ता न्यायालयाच्या आदेशानुसार खाली करण्यात आल्याने व तो नाफ्ता जलमार्गाने विदेशात नेण्यात आल्याने तो विषय आता संपलेला आहे. मात्र, गणेश बॅन्झोप्लास्टचा प्रश्न शिल्लक राहिलेला असून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. न्यायालयात या टाक्यांच्या प्रश्नावर न्यायाधिषांनी गणेश बॅन्झोप्लास्ट व प्रदुषण नियंत्रण मंडळाविरूध्द ताषेरे ओढले होते. तरीही मंडळाने एवढय़ा घाईगडबडीत त्या आस्थापनाला परवानगी का दिली असा प्रश्न बांदेकर यांनी उपस्थित केला आहे. गणेश बॅन्झोप्लास्टला इंधन साठवण्यासाठी कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या गोष्टींचे पालन गणेश बॅन्झोप्लास्टने केलेले आहे याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून माहितीच्या हक्काखाली घेण्यात येणार आहे. मुरगाव पालिकेने कोणकोणते पदार्थ साठवण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली आहे. एमपीटीने त्यांना कोणकोणत्या अटींवर या व्यवसायासाठी परवानगी दिलेली आहे याचीही माहिती मिळवण्यात येणार असून प्रसंगी ती न्यायालयालाही पुरवण्यात येईल अशी माहिती नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी दिली.