प्रतिनिधी /बेळगाव
विविध संघ-संस्थांच्यावतीने आयोजित स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांनी आपल्या अंगभूत कलेला वाव द्यावा, असे कर्नाटक राज्य सौहार्द सरकारी फेडरेशनचे संचालक लक्ष्मण पवार यांनी सांगितले. विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव आयोजित गणेश महोत्सव-2021 स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नवजीवन हॉस्पिटल बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश चौळीगार हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गणेश चतुर्थी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी गणेश भक्तांसाठी गणेश महोत्सव-2021 अंतर्गत उत्कृष्ट घरगुती गणेशमूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना लक्ष्मण पवार यांनी स्पर्धकांचा गौरव करीत युवा नेतृत्व किरण जाधव हे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत हे प्रशंसनीय असल्याचे म्हटले.
किरण जाधव यांनी स्वागत करून गणेशभक्तांच्या कलेला वाव देणे हा स्पर्धेमागचा उद्देश असून सेवाभावी कार्यासह स्पर्धकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. डॉ. चौळीगार यांनीही जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. या स्पर्धा बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर व बेळगाव ग्रामीण अशा तीन विभागात ठेवण्यात आल्या होत्या. बेळगाव दक्षिणमध्ये बाळकृष्ण काटकर, अखिलेश कोकितकर, सागर हुंदरे आणि रुत्वी घोलसे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळविला. उत्तर विभागात वैभव बडमंजी, अमोल पुजारी, अथर्व जाधव व हरीश घोरपडे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. तर ग्रामीण विभागात अक्षय बाळेकुंद्री, विनोद मेणसे, पूनम रेडेकर व मारुती डोणकरी यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.