शाहुवाडी/प्रतिनिधी
कोरूना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात गणेश उत्सवा बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करून गणेश मूर्तिकार कुंभार बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी शाहुवाडी तालुका कुंभार समाजाच्या वतीने तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुंभार समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की सर्वत्र कोरोनाचा प्रसार सुरू आहे कोरोना संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने व शासनाच्या नियमांचं पालन करत कुंभार बांधवांनी गणेश मूर्ती तयार केल्या आहेत शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या चार फूट उंचीपर्यंत गणेश मूर्ती हजारो रुपये खर्चून तयार केल्या आहेत मात्र गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर असताना अचानकपणे गणेश उत्सव साजरे न करणे बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या निर्णयांचा कुंभार बांधवांना आर्थिक फटका बसणार असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मागणीनुसार तयार केलेल्या गणेश मूर्तींचे करायचं काय व झालेल्या खर्चाची भरपाई मिळणार कशी या विवंचनेत सर्व कुंभार बांधव आहेत यासाठी या निर्णयाचा फेरविचार करून या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शाहुवाडी तालुका कुंभार समाजाच्या वतीने अध्यक्ष अशोक कुंभार, उपाध्यक्ष पुंडलिक कुंभार , माजी नगरसेवक विनायक कुंभार, जयराम कुंभार, गणेश कुंभार, किरण कुंभार आदींनी आपल्या सहीचे निवेदन तहसीलदार शाहुवाडी यांना दिले आहे.