प्रशासनाने भूमिका जाहीर करण्याची मूर्तिकारांची मागणी : नियमावली जाहीर करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
गणरायाच्या आगमनासाठी अवघे अडीच महिने शिल्लक आहेत. यामुळे गणेशमूर्ती तयार करण्यासाठीची लगबग सुरू आहे. परंतु अद्यापही प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीबाबत ठोस निर्णय देण्यात न आल्याने मूर्तिकार संभ्रमात सापडले आहेत. मागील वषीच्या मोठय़ा मूर्ती अद्यापही मूर्तीशाळेतच असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या मूर्तिकारांमधून यावषी तरी लवकर नियमावली जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.
गणेशमूर्ती तयार करणारे गाव म्हणून बेळगावची एक वेगळी ओळख आहे. नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती घडविल्या जात असल्याने बेळगावसह गोवा, कोल्हापूर, इचलकरंजी, धारवाड, हुबळी, कारवार या परिसरातून मागणी असते. परंतु मागील 3 ते 4 वर्षांपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकारच अडचणीत सापडले आहेत. बाहेरील रेडिमेड मूर्तींचा भरणा, कौशल्यपूर्ण कामगारांची वानवा, साहित्याचे वाढीव दर आणि त्यातच प्रशासनाची आडकाठी भूमिका या सर्वांशी दोन हात करण्याची वेळ मूर्तिकारांवर येत आहे.
7 फुटांपर्यंत मूर्तींना परवानगी द्या
मागील वषी मंडळांच्या मागणीप्रमाणे मूर्तिकारांनी 8 ते 9 फुटांच्या गणेशमूर्ती तयार केल्या. परंतु गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक असताना प्रशासनाने आडमुठी भूमिका घेत मोठय़ा मूर्तींना परवानगी नाकारली होती. यामुळे मोठय़ा मूर्ती अद्यापही मूर्तीशाळांमध्येच आहेत. यावषीही असाच प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने भूमिका जाहीर करणे गरजेचे आहे. सध्या मूर्तिकार 4 फुटांपर्यंत गणेश मूर्ती तयार करत आहेत. परंतु हे परवडणारे नसल्याने किमान 7 फुटांपर्यंत मूर्तींना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
बेळगावमधील मूर्तिकारांची संख्या
- शहर व परिसरातील एकूण मूर्तिकार 70 ते 80
- मोठय़ा मूर्ती करणारे मूर्तिकार 10 ते 15
मूर्तिकारांसमोरील आव्हाने
- मूर्तीच्या उंचीबाबत ठोस निर्णय नाही
- मागील वषीच्या शिल्लक मूर्तींना परवानगीची गरज
- परराज्यांतून होणारी मूर्तींची मागणी थांबली
- काम कमी असल्याने कामगारांच्या पगाराचा प्रश्न
मंडळांनी एकत्रित तोडगा काढण्याची गरज
मागील वषी मूर्तींच्या उंचीबाबत उशिरा निर्णय जाहीर केल्याने मोठय़ा मूर्ती अद्यापही मूर्तीशाळेत आहेत. यामुळे मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावषीही गणेशोत्सव जवळ येऊनदेखील प्रशासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे मूर्तिकार संभ्रमात असून, महामंडळ तसेच मंडळांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
– विनायक पाटील (मूर्तिकार)