प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर टेम्पो पलटी झालेल्या अपघातात सिध्दू लिंगाप्पा पिडाई वय २६, रा. सातवी गल्ली राजीव गांधीनगर या तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले. हा अपघात शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर घडला. सुमित बडबडे, वरद मगदूम, आशपाक शेख, सद्दाम पठाण, रमेश हिटनाळे (सर्व रा. राजीव गांधीनगर) अशी जखमींची नावे आहेत. जयसिंगपूर येथील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जनाची शिरोळकडे निघाले होते.
ट्रॅक्टर पाठोपाठ मालवाहतुक टेम्पोमधून कार्यकर्ते निघाले होते. शनिवारी रात्री शिरोळकडे जाणाऱ्या वळणावर टेम्पोचालक रमेश हिटनाळे याचा ताबा सुटल्याने अपघात झाला. टेम्पो तीन वेळा पलटला, घटनास्थळी पोलीसांनी तात्काळ येऊन जखमींना उपचारासाठी पाठवले. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतची वर्दी सुर्यकांत मुडलगी यांनी पोलिसांत दिली.