विहिरीचे पाणी दूषित होऊ नये याकरिता नवनिर्वाचित नगरसेविकांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
गणेशोत्सवादरम्यान काही विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. या पार्श्वभूमिवर कणबर्गीमधील वॉर्ड क्र. 47 व 55 मधील विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली. येथील विहिरींचे पाणी दैनंदिन कामासाठी वापरण्यात येते. गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याने पाणी दूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेविका अस्मिता भैरगौडा पाटील आणि सविता मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गणेश विसर्जन करण्यासाठी तलावाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भैरगौडा पाटील व इतर नागरिक उपस्थित होते.