दोन्ही सभागृहात गोंधळ – ‘पेगॅसस’सोबतच महागाई, कृषी कायद्यांवरून विरोधक आक्रमक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या संसद अधिवेशनामध्ये विरोधकांचा गदारोळ अद्यापही सुरूच आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरणासह शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून विरोधी पक्ष आक्रमक होत आहे. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाम शुक्रवारीही तहकूब करण्यात आले. राज्यसभा सभागृह सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तसेच लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले गेले होते. मात्र, त्यानंतर काही वेळ चर्चा झाल्यानंतर पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाजात खंड पडला. आता सोमवारीच दोन्ही सदनांचे कामकाज सुरू होणार आहे.
पेगॅसस हेरगिरीप्रकरण उघडकीस आल्यानंतर यावरूनच संसदेत वादंग होत आहे. या मुद्यावर विरोधी पक्ष आक्रमक असून सरकारवर तोफ डागण्यात येत आहे. पेगॅसस या इस्त्रायली सॉफ्टवेअरद्वारे जगातील अनेक पत्रकार, नेते, वकील यांची हेरगिरी करण्यात आली आहे. देशातही अनेक राजकीय नेते, मंत्री, पत्रकार यांचे फोन हॅक करून या सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हेरगिरी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह अनेक मंत्र्यांचाही समावेश आहे. आपल्याच लोकांविरुद्ध या हेरगिरीसाठी या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे. संसदेच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजत आहे. तसेच आता इंधन दरवाढ, महागाई आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दाही विरोधकांनी उचलून धरल्यामुळे संसदेचे कामकाज खोळंबलेले दिसत आहे. दरम्यान, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सरकारला रोखण्याची रणनीती आखण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेसुद्धा पेगॅससच्या मुद्दय़ावरून आक्रमक झालेले दिसत आहेत.
‘पेगॅसस’संबंधी सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवडय़ात सुनावणी
पेगॅसस हेरगिरी प्रकरणाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे. ज्ये÷ पत्रकार एन. राम यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला अनुसरून सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या पीठापुढे शुक्रवारी पेगॅससबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीशांनी पुढील आठवडय़ात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. ज्ये÷ वकील कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी सरन्यायाधीशांच्या पीठासमोर पेगॅससबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दाखल केलेल्या याचिकेची माहिती दिली.