प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या पुणे येथील स्मारकाला गती द्यावी, जन्मगाव शेटफळे येथील स्मारकाचे सुशोभीकरण करावे, माडगुळे येथे साहित्य वास्तु उभी करावी आणि आटपाडी येथील नाट्यगृह काम सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्हा साहित्य चळवळतर्फे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना बुधवारी देण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत शासनाला भावना कळविण्याचे आणि सांगली जिल्ह्यातील स्मारकांबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले.
पुण्यासह शेटफळे आणि माडगूळे येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावे, आटपाडीतील निधीसह मंजूर नाट्यगृहाचे काम सुरु व्हावे, या मागणीसाठी 14 डिसेंबर रोजी गदिमा जनआंदोलन कविता जागर उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील साहित्यिक, सांस्कृतिक, विविध क्षेत्रातील कलावंत, पत्रकार अशा विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने स्वाक्षरींचे निवेदन तयार करण्यात आले होते. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याना ते देण्यात आले. ख्यातनाम गझलकार प्रदिप निफाडकर यांच्या संकल्पनेतून हे विधायक आंदोलन पार पडले होते. यावेळी सुमारे 125 हून अधिक साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलावंत क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरींचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी तयार केले होते.
सदरचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याना बुधवारी देण्यात आले. गदिमा स्मारक जनआंदोलन जिल्हा संयोजन समितीचे कार्यकर्ते महेश कराडकर, दयासागर बन्ने, अभिजित पाटील, नामदेव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी साहित्यिक अँड.अजित पुरोहित, गौतम कांबळे, वर्षा चौगुले, वंदना हुळबत्ते पत्रकार प्रकाश कांबळे शिवराज काटकर आदी उपस्थित होते.