प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 ने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या. किंबहूना अपरिहार्यपणे आपल्याला त्या शिकाव्या लागल्या. आपल्या गरजा कमी झाल्या तर जीवन सुकर होऊ शकते, हे आपल्याला समजले. कोविडने महिलांचे जीवनचक्रही बदलले. समाजाला आपली गरज असताना आपण मदतीला धावले पाहिजे, हा धडा लक्षात घेऊन जायंट्स सखीच्या सदस्या कार्य करतील, अशी अपेक्षा दया शहापूरकर यांनी व्यक्त केली.
जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, सचिव शीतल पाटील व पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवारी सकाळी स्कायपार्कच्या गॅलेक्सी सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जायंट्सच्या विशेष समितीचे सदस्य मोहन कारेकर, जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष अनंत जांगळे, विभागीय संचालक मदन बामणे, मावळत्या अध्यक्षा नम्रता महागावकर, नीता पाटील व शीतल पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जायंट्सच्या प्रार्थनेनंतर सखीच्या सदस्यांनी समूहगीत सादर केले. मोहन कारेकर यांच्या हस्ते संस्थापक नाना चुडासामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. अपर्णा पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, शीतल नेसरीकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. यानंतर अनंत जांगळे यांनी सर्वांना जायंट्सची कर्तव्ये सांगितली. मोहन कारेकर यांनी जायंट्स मेनच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या जायंट्स सखीने उत्तम कार्य करत वेगळा ठसा उमटविला आहे, असे सांगून त्यांची प्रशंसा केली.
मदन बामणे यांनी, जायंट्स सदस्यांनी एकजुटीने कार्य करणे आवश्यक आहे. कामकाज सुसूत्र व्हावे, यासाठी पदावली असते. परंतु सर्वांच्या एकजुटीतूनच अनेक उपक्रम यशस्वी होऊ शकतात, हे लक्षात घेऊन कार्य करा, असा सल्ला दिला. त्यांनी नूतन कार्यकारिणीला अधिकारसूत्रे प्रदान केली. तत्पूर्वी मावळत्या अध्यक्षा नम्रता महागावकर यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेऊन यापुढेही सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. नूतन अध्यक्षा नीता पाटील यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून जायंट्सच्या परंपरेला शोभेल, असेच कार्य करण्याची ग्वाही दिली.
दया शहापूरकर यांनी कोविड-19 मुळे झालेले बदल सांगून महिलांनी या काळात अनेक उपक्रम सुरू केले. महिला असण्याचा अभिमान नेहमी बाळगावा, असे सांगितले. तेजस्विनी सोमसाळे यांनी सूत्रसंचालन केले. शीतल पाटील यांनी आभार मानले.