जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनाला यश: बायडेन प्रशासनाची महत्त्वपूर्ण घोषणा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोरोना महामारीमुळे स्थिती बिघडलेल्या देशांना अमेरिकेतील जो बायडेन प्रशासन मदत करणार आहे. जून महिन्यात 2 कोटी लसीचे डोस दान करणार असल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री केली आहे. यापूर्वी अमेरिकेने 6 कोटी डोस दान करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
श्रीमंत देश स्वतःच्या मुलांना आणि तरुणांचे लसीकरण करत आहेत, प्रत्यक्षात त्यांना याची गरज नसल्याचे म्हणत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेबिसियस यांनी टीका केली होती. श्रीमंत देशांनी स्वतःची जबाबदारी ओळखून गरज असलेल्या देशांना लस पुरवावी असे त्यांनी म्हटले होते.
2 कोटी अतिरिक्त डोस
अमेरिकेच्या प्रशासनाने यापूर्वीच 6 कोटी डोस दान करण्याची घोषणा केली आहेत. तर अध्यक्षांनी आणखीन 2 कोटी डोस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. गरीब किंवा लस खरेदी करू शकत नसलेल्या देशांना हे डोस पुरविण्यात येणार आहेत. तसेच संक्रमण आणि अधिक बळी जात असलेल्या देशांना हे डोस मिळतील. ऍस्ट्राझेनेकाच्या लसीचे डोस प्रामुख्याने दिले जाणार आहेत. एफडीएने अद्याप या लसीला मंजुरी दिलेली नाही.
गरीब देशांची काळजी
डब्ल्यूएचओचे प्रमुख घेब्रिसियस यांनी एका पत्रकार परिषदेत कोरोना संकटासंबंधी चर्चा केली होती. श्रीमंत देश मुलांचेही लसीकरण करत आहेत. हे लसीकरण रोखण्याचे मी आवाहन करतो. मुलांच्या लसीकरणात वापरण्यात येणारे डोस गरीब देशांना दान करण्यात यावेत, जेणेकरून महामारीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविता येईल. गरीब देशांमधील आरोग्य कर्मचाऱयांनाही अद्याप लस मिळालेली नाही. आम्ही सर्व देशांना लस पुरवू इच्छितो. काही देशांकडे लसीचा मोठा साठा आहे. असे देश कोरोनाचा अत्यंत कमी धोका असलेल्या लोकांचेही लसीकरण करत आहेत. त्यांनी आता गरीब देशांना मदत करावी असे घेब्रिसियस यांनी म्हटले आहे.