रोम / वृत्तसंस्था
जगातील गरीब देशांपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसी पोहोचवण्यासाठी बलाढय़ देशांना आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत श्रीमंत देशांमध्ये 70 टक्के तर गरीब देशांमध्ये केवळ 3 टक्के लोकांचेच लसीकरण करण्यात आले आहे. हे असंतुलन दूर करण्यासाठी लसनिर्मिती करणाऱया देशांनी उत्पादन वाढवून गरीब देशांना मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता असल्याचे मतप्रदर्शन शनिवारी ‘जी-20’ परिषदेच्या पहिल्या सत्रात करण्यात आले. इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी मांडलेल्या मुद्दय़ाला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व जागतिक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसांच्या युरोप दौऱयावर आहेत. दौऱयाच्या दुसऱया दिवशी शनिवारी त्यांनी इटलीची राजधानी रोम येथे जी-20 शिखर परिषदेत भाग घेतला. शिखर परिषदेच्या सुरुवातीला झालेल्या सत्रात पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी ऊर्जा क्षेत्रात एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य या विषयावर एक सत्र झाले. त्यातही जागतिक नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि अनेक जागतिक नेते या बैठकीत उपस्थित होते.
इराण आण्विक करारावर चर्चा
या बैठकीत इराण आण्विक करारावरही चर्चा झाली. तसेच जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, यावरही जी-20 देशांच्या नेत्यांनी बैठकीत निर्णय घेतला.