वार्ताहर / जैतापूर
पडवेसारख्या ग्रामीण भागात राहणाऱया एका सर्वसामान्य शेतकऱयाला तब्बल 32 हजार रूपयांचे बिल काढून महावितरणने या शेतकऱयाला शॉक दिला आहे. महादेव भगवान भोसले असे या वृध्द शेतकऱयाचे नाव असून एवढे बिल भरण्यापेक्षा वीजच नको, असे म्हणण्याची वेळ या शेतकऱयावर आली आहे.
महावितरण विभागा या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असतो. कोरोना लॉकडाऊनमध्ये मीटर रिडींग न मिळाल्याने सरासरी बिले काढणाऱया महावितरणने नंतर मात्र रिडींगनुसार भरसाठ बिले काढून सर्वसामान्यांना शॉक दिला होता. यामध्ये गोरगरीब जनतेची ससेहोलपट होत आहे. पडवे येथील महादेव भगवान भोसले यांनाही महावितरणणे असाच धक्का दिला आहे. भोसले यांचे जानेवारी महिन्याचे बिल 32 हजार 20 रूपये आले आहे. ऑक्टोबर महिन्यात 280 रूपये बिल आले होते, ते भरल्यानंतर मध्ये 2 महिने बिलच आले नाही. त्यानंतर आता हाती पडले ते जानेवारी महिन्यात. तीन महिन्याचे एवढय़ा मोठय़ा रक्कमेचे बिल पाहून भोसले यांना धक्का बसला. दरमहा 300 रूपयाच्या आसपास येणारे बिल अचानक 32 हजारावर कसे पोचले यासह एवढे पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न भोसले यांच्यासमोर पडला आहे.