प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने 31 वर्षापूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती तयार केली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही मूर्ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानुसार येत्या 1 मार्च रोजी शोभायात्रेने मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्त केली जाणार आहे. महाद्वार रोड, गुजरी येथील सराफ संघाच्या कार्यालयाजवळून सायंकाळी 5 वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल. शोभायात्रेच्या सांगतेनंतर मूर्तीला अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात विराजमान केले जाणार आहे, अशी माहिती गुरुवारी सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना गायकवाड म्हणाले, मूर्ती तयार करण्यासाठी तीन दशकांपूर्वी अडीचशेहून अधिक दानशुरांकडून सराफ संघाने चांदी स्वीकारली होती. यापैकी 51 किलो चांदी वापरुन शास्त्रोक्त पद्धतीने अंबाबाईची मूर्ती बनवली आहे. महाद्वार रोड, कसबा गेट येथील चांदी कारागिरी वसंतराव माने यांनीही मूर्ती साकारताना अंबाबाईच्या मुळमूर्तीची प्रतिमा पाहूनच बनवली. सध्या सराफ संघाकडे त्याकाळी जमवलेल्या चांदीपैकी 29 किलो चांदी शिल्लक आहे. या चांदीपासून अंबाबाईसाठी मोठा पाठ करुन तो देवस्थान समितीकडे दिला आहे.
तसेच अन्य कोणकोणते दागिने हवे आहेत, याची विचारपूस करुन तेही दागिने समितीला बनवून दिले जाणार असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस सराफ संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास चाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड व सरदार सासने आदी उपस्थित होते.
रोज अभिषेकही होणार…
सराफ संघाकडून दिली जाणारी अंबाबाईची चांदीची मूर्ती अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपातील सुवर्ण पालखी शेजारी विराजमान केली जाणार आहे. यामूर्तीवर रोज अभिषेक केला जाणार आहे. तसेच 4 मार्च रोजी सराफ संघाकडून मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. महायज्ञाचेही मंदिरात आयोजन केले जाणार असल्याचे कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.