काश्मीर खोऱयातील हृदयस्पर्शी घटना : बर्फात 4 तास पायी प्रवास करत वाचविला जीव
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे जनजीवन कोलमडून गेले आहे. सामान्य सुविधांसाठी देखील लोकांना संघर्ष करावा लागत आहे. लोकांच्या याच संघर्षात भारतीय सैन्य त्यांच्यासोबत उभे राहिले आहे. याचेच उदाहरण सादर करत एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी 100 सैनिकांनी कित्येक तास बर्फातून पायी प्रवास केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सैन्याचे कौतुक केले आहे. जोरदार हिमवृष्टी सुरू असताना शमीमा नावाच्या गरोदर महिलेला रुग्णालयात हलविण्याची गरज निर्माण झाली होती. या प्रसंगात 4 तासांपर्यंत 100 हून अधिक सैनिक आणि 30 नागरिकांनी शमीमासोबत बर्फातून पायी वाटचाल केली आहे. शमीमाला स्ट्रेचरच्या माध्यमातून बर्फमय भागातून नेण्यात आले असून सर्वच स्तरातून याचे कौतुक केले जात आहे.
पंतप्रधानांकडून कौतुक
शमीमाने पुत्राला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. याप्रकरणी मोदींनी ट्विट करत सैन्याच्या शौर्याला सलाम केला आहे. आमचे सैन्य शौर्य आणि व्यावसायिकतेसह माणुसकीसाठी ओळखले जाते. जनतेच्या अडीअडचणींच्या प्रसंगी सैन्याकडून सर्वप्रकारची मदत करण्यात येते. आमच्या सैन्याबद्दल गर्व असल्याचे म्हणत मोदींनी शमीमा आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. जीवघेण्या हिमवृष्टीतही सैन्याने जनसेवेला प्राधान्य दिले आहे.