प्रतिनिधी/ वास्को
जनता कर्फ्युच्या तिसऱया दिवशी काल मंगळवारी वास्कोत मागच्या दोन दिवसांप्रमाणेच सकाळी गोंधळ आणि संध्याकाळी सामसुम अशीच परिस्थिती होती. मात्र, पोलिसांनी शहरात सर्वाधिक गोंधळ माजवणारे भाजी मार्केट बंदच ठेवण्यास व्यापाऱयांना भाग पाडलेले आहे. तिसऱया दिवशीही वास्कोत बंद चांगला प्रतिसाद लाभला.
वास्को शहर व परिसरात मागच्या दोन दिवसांप्रमाणेच काल मंगळवारीही सकाळच्या वर्दळ आणि दुपारनंतर सामसुम अशीच परिस्थिती राहिली. बहुतेक हॉटेल व्यवसायीकांनीही दुपारनंतर हॉटेल्स बंद ठेवणेच पसंद केलेले आहे. हार्डवॅअर दुकानदारांना दुकाने खुली ठेवण्याची मुभा असली तरी अवघेच काही दुकानदार दुकाने उघडी ठेवतात. बाजारात सगळी सामसुम राहत असल्याने या दुकानदारांनाही सध्या ग्राहक मिळत नसल्याचे दिसून येते. सकाळच्या वेळी किराण दुकाने खुली असतात. मात्र, बाजार पेठा व इतर व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद आहेत. वास्को शहरातील भाजी मार्केटमध्ये वारंवार गर्दी उसळत असल्याची दखल घेऊन पोलिसांनी गेले दोन दिवस ही मार्केट खुले करू दिलेले नाही.
मात्र, या बंद मार्केटमधील बरेच विक्रेते समोरच्या रस्त्यावर ठाण मांडून गोंधळ माजवू लागले आहेत. ठिकाणी व्यापार वाढू लागलेले असून या व्यापाऱयांमुळे ग्राहकांची सोय होत असली तरी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यक आहे.