अनेक नवजात बालकांना दिवसा झोपण्याची आणि रात्री जागण्याची सवय असते. त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या आयांनाही रात्रीची झोप घेता येत नाही. त्यांच्याही झोपेचे खोबरे होते. तथापि, गर्भावस्थेत मातेच्या आहारात मॅग्नेशियम धातूयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात असतील तर मूल जन्माला आल्यानंतर ते रात्रीचे जागत नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे बालकाच्या मातेलाही रात्री व्यवस्थित झोप घेता येते आणि त्यामुळे तिचा दिनक्रमही सुव्यवस्थित राहतो.
मॅग्नेशियम धातू असणारे पदार्थ योग्य प्रमाणात सेवन केल्यास महिलेचे आणि तिच्या गर्भाचे आरोग्य सुव्यवस्थित राहते. यामुळे रक्तदाब संतुलित राहतो. मानसिक तणाव कमी होतो, असे संशोधनात आढळले आहे. गर्भवती महिलेने तिच्या शरिरातील या धातूचे प्रमाण योग्य राखल्यास तिच्या गर्भालाही त्याचा लाभ होतो. परिणामी गर्भही सुदृढ होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
मॅग्नेशियममुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे रात्रीची झोप चांगली लागते. असे ‘मॅग्नेशियमयुक्त’ मूल जन्माला आल्यानंतर त्याला रात्री व्यवस्थित झोप लागते. म्हणून मातेचीही रात्रीची जागरणे टळतात. या धातूमुळे अर्धशिशी (मायग्रेन) किंवा डोकेदुखीचा विकार होत नाही, असे आढळले आहे. हा या धातूचा अतिरिक्त लाभ आहे. गर्भावस्थेत हा धातू प्रतिदिन 360 मिलीग्रॅम या प्रमाणात पोटात जाणे आवश्यक आहे. हा धातू शरिरातील कॅल्शियम या धातूसमवेत काम करतो. हे दोन्ही धातू एकमेकांचे गुणधर्म वर्धिष्णू करतात. मॅग्नेशियमची कमतरता असेल तर कॅल्शियमच्या कार्यावरही विपरीत परिणाम होतो. या दोन धातूंच्या योग्य सेवनाने भविष्यकाळात महिलांचे अस्थिदुर्बलता या विकारापासून संरक्षण होते. असे या दोन धातूंचे अनेक लाभ शोधून काढण्यात आले आहेत.