ऑनलाईन टीम / मुंबई :
गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची महती सांगण्यासाठी लवकरच अभिनेता अजय देवगण आता चित्रपटाची निर्मिती करणार आहे. फिल्म क्रिटीक तरुण आदर्श यांनी याबाबत ट्विट द्वारे माहिती दिली.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या गलवान खोऱ्यात 14 आणि 15 जूनला भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यावेळी चिनी सैनिकांची संख्या जास्त असूनही भारतीय जवानांनी अभूतपूर्व अशा शौर्याचे प्रदर्शन केले होते. मात्र, यावेळी 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते.
तरुण आदर्श आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या चित्रपटाचे नाव असून ठरवण्यात आलं नाही. या चित्रपटात चीनी लष्कराशी लढा देणाऱ्या भारताच्या 20 जवानांचे बलिदान आणि शौर्य दाखवले जाईल. तसेच चित्रपटातील कलाकार हे अजून निश्चित झालेले नाही आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. दरम्यान, अजय देवगण लवकरच ‘भुजः द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लॉक डाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, एमी विर्क, प्रणिता सुभाष, शरद केळकर यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. अभिषेक दुधैया हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक आहे.