कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
लष्करी वसतीगृहातील एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिया सतीश पाटील (वय 32) असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी 18 जून रोजी दुपारी या महिलेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने दोरी कापून तिला मिलीटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
मानसिक अस्वस्थपणातून या महिलेने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. सुप्रियाचा पती सतीश हे लष्करी सेवेत आहेत. ग्लोब चित्रपटगृहा पाठिमागे असलेल्या वसतीगृहात या दांपत्याचे वास्तव्य होते. राहत्या घरी तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.