उष्णतेपासून बचावासाठी रिक्षाचालकाचा अनोखा उपाय
एप्रिलमध्येच तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तप्त उन्हात घरातून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांना घाम फुटला आहे. अशा स्थितीत माणसांनी ठंडा-ठंडा कूल कसे रहावे हा प्रश्न उभा ठाकतो. एका रिक्षाचालकाने यावर कमालीचा उपाय शोधून काढला आहे, ज्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ हे या व्यक्तीने सिद्ध करून दाखविले आहे. या रिक्षाचालकाने उन्हाळय़ात थंड राहण्यासाठी स्वतःच्या एका रिक्षाला नवा लुक दिला आहे. याकरता त्याने रोपे आणि गवताचा वापर केला आहे. यामुळे रिक्षामध्ये अन्य रिक्षांच्या तुलनेत उन्हाचा त्रास कमी होतो.
व्हायरल छायाचित्रात एक व्यक्ती रिक्षात बसलेला दिसून येतो. परंतु ही रिक्षा दिसण्यास सर्वसामान्य रिक्षांपेक्षा खूपच वेगळी दिसून येत आहे. कारण यावर अत्यंत हिरवळ दिसून येतेय. या रिक्षाच्या छतावर गवत उगविले इसून कुंडय़ांमध्ये काही रोपांची लागवड करण्यात आली आहे. उन्हाळय़ात रिक्षामधून प्रवास करणाऱया प्रवाशांना थंड वाटावे म्हणून या चालकाने ही उपाययोजना केली आहे.
हे छायाचित्र इरिक सोलहाइम यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. ‘या भारतीय व्यक्तीने उन्हाळय़ात दिलासा मिळावा म्हणून स्वतःच्या रिक्षावर गवत उगविले आहे, खरोखरच ही कमाल आहे’ असे सोलहाइम यांनी नमूद केले आहे. इरिक यांच्या पोस्टला आतापर्यंत 20.9 हजार लाइक्स आणि 2 हजारांहून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी कॉमेंट दिली आहे.