कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर:गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरात एका गव्याने तळ ठोकला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची दुसरी पहाट देखील गवा आला रे आला! म्हणत उजाडली आहे. गुरुवारी याच गवारेड्याने बोंद्रेनगर-पाडळी खुर्दच्या हद्दीत दर्शन दिले होते. तर आज पहाटे हा गवा पंचगंगा घाटावर फिरताना नागरिकांना दिसला. दरम्यान, काल वनविभागाने या गव्याला नैसर्गिक अधिसवात परतवून लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र गवा पुन्हा कोल्हापूरात दिसल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे.
गेले दोन दिवस ठाण मांडलेल्या या गव्याने गुरुवारी मध्यरात्री बीडशेड कडून कोल्हापूरच्या दिशेने आला. अलफोनसा स्कुल, नरसिंह कॉलनी, बोंद्रेनगर माळ, रान-पाडळी खुर्द असा प्रवास केला. दरम्यान गुरुवारी पहाटे या गव्याने गगनगिरी पार्क येथे पहाटे नागरिकांना दर्शन देताच त्यांची भीतीने गाळण उडाली. यावेळी स्थानिकांनी गव्याला शेतात हुसकावून लावले. याची कल्पना वनविभागाला देण्यात आली. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल दिवसभर पाडळी खुर्दच्या हद्दीत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, कोल्हापुरातील लक्षतिर्थ वसाहतीत काल गुरुवारी रात्री बारा साडे वाजता कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे परिसरातील लोक जागे झाले. त्यावेळी तिथे एक गवा असल्याचे निदर्शनास आले. गवा लक्षतिर्थ वसाहतीत येऊनये व त्याला उत्साही गर्दीचा फटका बसु नये म्हणून काही तरुणांनी त्याला दुरुनच हुसकावुन लावले. आज सकाळी पुन्हा एकदा हा गवा पंचगंगा नदीघाटवर चरताना दिसला. याकडे वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.