पोंबरे पैकी चव्हाणवाडी येथील घटना; जखमी शेतकरी पाटपन्हाळा येथील
बाजारभोगाव / वार्ताहर
पोंबरे पैकी चव्हाणवाडी (ता. पन्हाळा ) येथील रेवा नावाच्या शेतात भांगलणीसाठी व राखणीसाठी गेलेल्या हिंदूराव केरबा पाटील (वय ५५ , रा.पाटपन्हाळा , ता. पन्हाळा ) या शेतऱ्यावर गव्याने हल्ला करून कोथळा बाहेर काढला. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली असून जखमी शेतकऱ्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबात मिळालेली माहीती अशी, पोंबरे येथील लघुपाटबंधारे तलावाशेजारी चंद्रकांत पाटील (कोपार्डेकर) यांची रेवा नावाची शेती आहे. ही शेती हिंदूराव पाटील (रा.पाटपन्हाळा ) कसतात. ते पत्नीसह शेतघरात राहतात. रविवारी दुपारी हिंदूराव पाटील हे पत्नीसह दवाखान्यात गेले होते. तिथून परत येवून भांगलणीचे काम करीत होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आलेल्या गव्याने पाटील यांच्यावर हल्ला केला. पोटात शिंग खूपसल्याने त्यांचा कोथळा बाहेर आला. गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला. तेथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बाळू कातळे (रा. चव्हाणवाडी ) यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी चव्हाणवाडी येथील राजू बुक्कम यांना बोलावून त्यांच्या वाहनाने पोहाळे तर्फ बोरगाव पर्यंत नेले. त्यानंतर रूग्णवाहीकेतून उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. रात्री साडे आठच्या सुमारास त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गव्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतात काम करायचं की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. गव्यांचा बंदोबस्त करा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.