सांगली/प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून सांगली वाडीत धुमाकूळ घालणारा गवारेडा आज सकाळी सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये घुसला त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणचा बाजार गव्याच्या भीतीमुळे बंद पडला आहे. सध्या गव्याला पकडण्यासाठी मार्केटयार्ड परिसरातील चारही बाजू नागरिकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मार्केट यार्ड नंबर बंद केले आहे.
या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिकेचे अग्निशमन दल, वनविभागाचे कर्मचारी, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. दरम्यान या गव्याला पकडण्यासाठी कोल्हापुरातून पशुवैद्यकीय संतोष वाळवेकर यांच्यासह विशेष पथक सांगलीत दाखल झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत गवा नागरी वस्तीत घुसू नये यासाठी परिसरातील रहदारी चे रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांच्यामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.गेल्या चार दिवसांपासून हा गवा सांगलीवाडी येथील रेल्वे स्टेशन बाजूला होता. मात्र आज पहाटे तो सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात घुसल्याने खळबळ उडाली आहे.