प्रतिनिधी/ सांगे
सांगे तालुक्यात 60 टक्क्यांहून जास्त वनक्षेत्र असून सोबतीला नेत्रावळी अभयारण्य आहे. मुख्य ररस्त्याच्या बाजूने जंगल असल्यामुळे या भागातून प्रवास करणाऱया दुचाकीचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या भागात वन्यजीवांनी धडक देण्याचे प्रकार चालूच असून गेल्या गुरुवारी असाच एक प्रकार कावरे-रिवण येथे घडला.
दुपारी 3.30 च्या दरम्यान केपे येथील आपले काम उरकून रिवणमार्गे नेत्रावळी येथील आपल्या घरी जात असलेल्या सानिल शिवदास देविदास या 19 वषीय युवकाला रस्ता पार करत असलेल्या एका गव्यारेडय़ाने धडक दिली. त्यामुळे तो बाजूला फेकला जाऊन स्कूटरचे तर नुकसान झाले, शिवाय सानिल याला गंभीर दुखापत झाली. सध्या तो गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.
काही दिवसांपूर्वी रिवण येथील एका इसमाला बागायतीमध्ये रानडुक्करने हल्ला केल्याने मृत्यू आला होता. तसेच यापूर्वी पिर्ला, भाटी भागांमध्ये रानटी जनावरांची धडक बसून माणसे जखमी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रिवण ते नेत्रावळी हा सुमारे वीस किलोमीटर अंतराचा रस्ता जंगल भागातून जात असून या रस्त्यावरून गवेरेडे सर्रास जाताना दिसतात. तसेच माकड व अन्य रानटी जनावरांचा देखील वावर असतो. सध्याच्या परिस्थितीत त्यापैकी गवेरेडे धोकादायक ठरत आहेत.