कोलकाता / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर येत्या काही दिवसात किंवा आठवडय़ात दुसरी अँजिओप्लॅस्टी केली जाईल. पण, तातडीने याची गरज नाही. त्यामुळे एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असे येथील वुडलँड्स हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डॉ. रुपाली बसू यांनी सोमवारी सांगितले.
9 सदस्यीय वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने गांगुली यांच्या प्रकृतीबद्दल सविस्तर चर्चा केली आणि आवश्यकता भासल्यास दुसरी अँजिओप्लॅस्टी करावी, असा निर्णय घेण्यात आला. सध्या गांगुली यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे, त्यांना एक-दोन दिवसात डिस्चार्ज दिला जाईल, असेही डॉ. बसू यांनी येथे नमूद केले.
तज्ञ कार्डिओलॉजिस्ट डॉ. देवी शेट्टी व डॉ. आर. के. पांडा यांनी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरुन चर्चेत सहभाग घेतला. अमेरिकेतील आणखी एक तज्ञ यात फोनवरुन सहभागी झाले, असे त्या पुढे म्हणाल्या. गांगुली यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या घरी देखील काही खबरदारी घेतली जाईल, अशी व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. देवी शेट्टी आज (मंगळवार दि. 5) गांगुली यांना भेटतील आणि अन्य सहकारी डॉक्टरांशी चर्चा करुन उपचाराची पुढील दिशा ठरवतील, असेही संकेत आहेत.
‘गांगुली यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे, दुसरी अँजिओप्लॅस्टी लांबणीवर टाकणे अधिक योग्य ठरते. गांगुली यांना छातीत कोणत्याही वेदना नाहीत. त्यामुळे, चिंतेचे कारण नाही’, असे डॉ. बसू यांनी याप्रसंगी सांगितले. गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला होता. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिनीत तीन ब्लॉक असल्याचे त्यात आढळून आले. एक स्टेन्ट घालून ते ब्लॉकेज काढण्यात आले आहेत.
अनुराग ठाकुर, जय शाह यांची सदिच्छा भेट
केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकुर व बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सोमवारी गांगुली यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. ‘दादा अवघ्या देशाचा हिरो आहे. त्याने क्रिकेटमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत आणि प्रतिस्पर्ध्यांवर कित्येकदा मात केली आहे. आताही तो प्रतिकूल स्थितीवर मात करेल’, असा विश्वास अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. गांगुली पूर्वपदावर आल्यानंतर आणखी काही क्षेत्रात देखील लक्षवेधी योगदान देतील, असे अनुराग म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होत असून गांगुली भाजपमध्ये प्रवेश करतील, असे आडाखे यापूर्वीपासूनच बांधले गेले आहेत. अनुराग यांनी अन्य क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला, त्यात हाच संदर्भ असल्याचे मानले जाते. स्वतः गांगुली यांनी मात्र आजवर याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. गांगुली यांचे निकटचे मित्र व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक भट्टाचार्य यांनी गांगुली यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्यासाठी कमालीचे दडपण आहे, असा दावा यापूर्वी केला आहे.