प्रतिनिधी/ निपाणी
कोल्हापूर शहरात मागणीप्रमाणे गांजाची विक्री करणाऱया निपाणी येथील युवकास पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडून 96 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेश अरुण नांदणीकर (वय 26, रा. भाट गल्ली, निपाणी, सध्या रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. सदर कारवाई शुक्रवारी दुपारी जुना राजवाडा पोलिसांनी केली.
पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांना शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास सानेगुरुजी वसाहत येथील नारायणी अपार्टमेंटमधील गणेश नांदणीकर या युवकाकडून गांजाची विक्री होत असल्याची मिळाली होती. या माहितीच्या आधारे जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला. यावेळी गणेश नांदणीकर याला ताब्यात घेत त्याच्याकडे तपासणी केली असता राहत्या घरातून 4 किलो 52 ग्रॅम वजनाचा गांजा, मोपेड व मोबाईल असा 96 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित गणेश यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, साहाय्यक फौजदार विजय कोळी, सहकारी अनिल ढवळे, प्रकाश संकपाळ, रमेश डोईफोडे, परशुराम गुजरे, शाहू तळेकर, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, संदीप बेंद्रे यांनी केली.
गांजा खरेदी-विक्री निपाणी कनेक्शन?
निपाणीसह बेळगाव जिल्हय़ात गत महिन्याभरात गांजा खरेदी-विक्री प्रकरणी कारवाईचा धडाका पोलिसांनी लावला आहे. निपाणी शहरातही नुकतीच कारवाई करताना गांजासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान कोल्हापुरात करण्यात आलेल्या कारवाईत मूळचा निपाणीचा असलेल्या युवकाचा समावेश आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकात गांजा विक्रीचे जाळे पसरले असल्याचे स्पष्ट होते. याची दखल घेत दोन्ही राज्यातील पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविताना गांजा प्रकरणाची पाळेमुळे खोदून सहभागींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.