दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद, पोलीस अधीक्षकांची माहिती
टोळीचा सूत्रधार शोधून काढण्यासाठी सखोल तपास
वार्ताहर / सावंतवाडी:
सिंधुदुर्गात गाजा आणि ड्रग्ज विक्री करणारी टोळी कार्यरत असून या प्रकरणाचा सखोल तपास करून पाळेमुळे खणून काढली जातील. या टोळीचा म्होरक्मया आणि कोठून पुरवठा होतो, याचा शोध घेतला जाणार आहे. गांजा प्रकरणात आता दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तीन किलो गांजा तरुणांच्या टोळीकडे आढळल्याने आम्ही सतर्क झालो असून अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.
यावेळी प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी संजिता महोपात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर उपस्थित होते.
टोळीचा गुन्हा दाखल
दाभाडे म्हणाले, गांजा प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढली जाणार आहेत. गांजाची तस्करी कोठून होत आहे, याचाही शोध सुरू आहे. तीन किलो गांजा सापडल्याने आणि 19 वर्षीय तरुणांची संख्या अधिक असल्याने सेक्शन, कलम बदलण्यात आली आहेत. त्यामुळे टोळीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्हय़ात दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. प्रथमच जिल्ह्य़ात तीन किलो गांजा सापडला आहे. त्यामुळे आम्ही आणखी कोणी या टोळीत सहभागी आहे का, याचा शोध घेत आहोत. या टोळीतील तरुणाकडून गांजा कुठून आणि कोठे आणून विकला जात होता, याचाही तपास केला जात आहे.
जनजागृतीचा विचार
अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवली जाणार आहे. चेक पोस्ट अलर्ट केले जाणार आहेत. तरुणाई अवैध धंद्यात गुंतल्याचे समोर आल्याने एनजीओमार्फत जनजागृती करण्याचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची तिसरी लाट आणि गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मास्टर प्लान लवकरच तयार केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
बांद्यात सायरन बसवा!
यावेळी बांदा येथील पूरस्थितीची कल्पना देण्यासाठी सायरन बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दाभाडे यांच्याकडे केली. बांदा भागात पोलिसांचे कोणतेही सहकार्य नागरिकांना मिळत नाही, अशा तक्रारी यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केल्या. पूर परिस्थितीत पोलीस यंत्रणा कुठेच दिसली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ात पोलीस दलात लवकरच बदल करण्याच संकेत त्यांनी दिले. यावेळी अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार सेल हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्षा उद्योग व्यापार सेल दर्शना बाबर-देसाई, संतोष जोईल, नियाज शेख, प्रीतम हरमलकर, रुपेश बांदेकर उपस्थित होते.