गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा सवाल
प्रतिनिधी / मडगाव
औषधी वापराच्या नावाखाली गोव्यात गांजा लागवडीला प्रोत्साहन देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोवा हे ड्रग्ज डेस्टिनेशन बनवायचे आहे का, असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. आपल्या मुलांच्या हाती यापुढे सहज गांजा उपलब्ध होणे हे गोव्यातील पालकांना आवडेल का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे .
आपल्या एका व्हिडीओ संदेशात सरदेसाई यांनी हे सरकार सर्वांना काळोखात ठेऊन हा निर्णय पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. गांजाचा वापर करण्यासंदर्भात राज्यात कुठलीही नियंत्रण यंत्रणा नाही. अशी यंत्रणा नसल्याने गोवेकर कॅसिनोचे कसे दुष्परिणाम भोगत आहेत त्याचे उदाहरण ताजे आहे. असे असताना आता गोव्यात अनियंत्रित गांजाची लागवड झाल्यास त्याचे काय परिणाम गोव्यातील युवा पिढीवर होऊ शकतात यावर पालकांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. या पालकांनी आता सरकारला जाब विचारण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रस्तावाची फाईल तपासायला मिळावी यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला आहे. हा प्रस्ताव कुणी आणला आणि त्याचा नेमका कुणाला फायदा होणार हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. या लागवडीचा गोव्याला खराच काही फायदा आहे का की, हाही निर्णय सरकार दिल्लीवाल्यांच्या सांगण्यावरून घेत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
दिल्लीच्या दबावापुढे प्रमोद सावंत यांनी म्हादईचा सौदा केला. दिल्लीच्याच दबावापुढे झुकून ते गोवा कोळसा हब करू पाहत आहेत. आता गोवा ड्रग्ज डेस्टिनेशन करून ते गोव्याची उरली सुरली प्रति÷ाही धोक्मयात घालू पाहत आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. अशा गोवाविरोधी मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी ‘सेव्ह गोवा नाऊ’ या मोहिमेखाली ‘टीम गोवा’ तयार करून गोवा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.