येडियुराप्पा मार्गावर मार्केट एसीपींची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर येथील येडियुराप्पा मार्गावर गांजा विकणाऱया एका तरुणाला शनिवारी अटक करण्यात आली. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 1 किलो 305 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर बाबू पाटील (वय 22) रा. मस्जीद गल्ली, धामणे असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत 13 हजार रुपये इतकी होते. त्याच्याजवळून 250 रुपये रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली असून अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 कलम 20(बी) अन्वये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
येडियुराप्पा मार्गावर गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच एसीपी सदाशिव कट्टीमनी, शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून ज्ञानेश्वर पाटील याला ताब्यात घेतले. गांजा विकताना पोलिसांच्या जाळय़ात अडकलेला ज्ञानेश्वर हा व्यवसायाने गवंडी कामगार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गांजा जप्त करणाऱया पथकाचे कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे. सरकारतर्फे स्वतः एसीपींनी फिर्याद दाखल केली असून ज्ञानेश्वरने हा साठा कोठून आणला? याची चौकशी करण्यात येत आहे. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून ज्ञानेश्वरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.