जिल्हा सीईएन विभागाची सौंदत्ती तालूक्यात कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव पोलिसांनी अंमलीपदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. बेळगावला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाममधून मोठय़ा प्रमाणात गांजा पुरवठा होतो. रविवारी सायंकाळी जिल्हा सीईएन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सौंदत्ती तालुक्यातील आचमट्टी क्रॉस जवळ गांजा विकणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे.
गांजा विक्रीसाठी आंध्रप्रदेशमधून दोघे जण सौंदत्ती तालुक्यात आल्याची माहिती मिळताच सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी आचमट्टी क्रॉसजवळ कारवाई करुन दोघा जणांना अटक केली. त्यांच्या जवळून साडेसहा किलो गांजा, दोन मोटार सायकली, दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
लक्ष्मीनारायण एम. रामस्वामी (वय 46), धनंजय श्रीरामलू (वय 36, दोघेही रा. मैलापूर, ता. रायदूर्ग, जि. अनंतपूर, आंध्र) अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. मोटार सायकलवरुन येवून गांजा विकताना ही कारवाई करण्यात आली असून या दोघा जणांविरुध्द सौंदत्ती पोलीस स्थानकात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सीईएन विभागाचे काम थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सुचनेवरुन चालते. पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिह्यातील विविध भागांत गांजा विकणाऱयांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम हाती घेतले आहे. अथणी, रायबाग पाठोपाठ आता सौंदत्ती तालुक्यातही त्यांनी कारवाई केली आहे.