महामार्गावरील ब्रिजखाली घडली घटना : स्वतःच अंगावर पेट्रोल ओतून केले कृत्य
प्रतिनिधी / बेळगाव
एका अज्ञात युवकाने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी गांधीनगर ब्रिजखाली घडली आहे. अंगावर पेट्रोल ओतून घेऊन सुमारे 35 ते 40 वषीय अनोळखी युवकाने भर वस्तीत आपले जीवन संपविले आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटविण्यात येत होती.
या घटनेने एकच खळबळ माजली आहे. बुधवारी सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत गांधीनगर ब्रिजखाली त्या अनोळखी युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे. पुलाखाली पेटवून घेतलेल्या या युवकाला पाहून नागरिकांनी माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अनोळखी युवक गतप्राण झाला होता. कोळसा झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पुलाखाली पडला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गांधीनगर, न्यू गांधीनगर परिसरात प्रयत्न सुरू ठेवले होते.
घटनास्थळावर पोलिसांना पेट्रोलचे कॅन आढळून आले आहे. काही पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून त्या युवकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार सुरुवातीला हा युवक गांधीनगर येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल आणण्यासाठी गेला होता. मात्र त्याला तेथे पेट्रोल दिले गेले नाही.
त्यानंतर पायी चालत तो कणबर्गी रोडवर पोहोचला होता. तेथील पंपावर पेट्रोल घेऊन गांधीनगरला पोहोचलेल्या या युवकाने ब्रिजखाली अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविला असून मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे.