उचगांव /प्रतिनिधी
वळीवडे ( ता. करवीर) येथे कोरोना पॉझिटिव्ह तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आज येथील साई वसन शाह कॉलनीमध्ये गांधीनगर चा एक व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे वळिवडे गांधीनगर परिसरातील कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या तीन झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.
काल रात्री उशिरा वळीवडे येथील कोरोना पॉझिटिव हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली. आज सकाळपासून सर्वत्र सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू होती. या तरुणाच्या संपर्कातील आणि नात्यातील 15 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव आल्याचे समजते. दरम्यान येथील साई वसन शाह कॉलनीमधील एका व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव आल्यामुळे परिसरातील गांभीर्य वाढले. हा परिसर जरी वळीवडे हद्दीत असला तरी तो गांधीनगरच्या अतिशय जवळ आहे. या व्यापाऱ्याचे गांधीनगर येथे मुख्य रस्त्यावर होलसेलचे दुकान आहे. गांधीनगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने व्यापार पेठेमध्ये एकच खळबळ उडाली.
वळीवडे येथील दक्षता समितीने हा परिसर सील केला आहे. हा परिसर सँनीटाईज करून घेण्यात आला. या परिसरातील कन्टोनमेंट झोनमधील दहा वर्षाच्या आतील आणि साठ वर्षाच्या वरील सर्व नागरिकांची यादी करून त्यांच्या तपासणीचे काम सुरू केले. तसेच या परिसरातील रुग्णांच्या तपासणीचे काम ही युद्धपातळीवर सुरू केले. गावचे सरपंच अनिल पंढरे, ग्रामपंचायत सदस्य विजय खांडेकर, विक्रम मोहिते, संजय चौगुले, ग्रामसेवक बी डी पाटील, पोलीस पाटील दीपक पासाण्णा, आरोग्य सेवक राकेश घोडके, ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्वजण दिवसभर परिसरात थांबून कार्यवाही करत होते.
दरम्यान वळिवडे गांधीनगर परिसरात रुग्ण सापडूनही येथील दुकाने मात्र नेहमीप्रमाणे सुरु होती.गांधीनगरात समूहसंसर्ग होवू नये म्हणून काळजी घेणे गरजेचे असुन यादृष्टीने प्रशासन व आरोग्य व्यवस्था गतिमान झाल्याचे चित्र आहे.