44 पैकी 41 जागांवर यश ः काँग्रेसला 2 तर ‘आप’ला केवळ एक जागा
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरातची राजधानी गांधीनगर महापालिका निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला आहे. या महापालिका निवडणुकीत भाजपला अत्यंत मोठा विजय मिळाला आहे. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मोठा दणका बसला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासाठी ही निवडणूक एखाद्या लिटमस टेस्टसारखी होती. भाजपला एकूण 44 जागांपैकी 41 ठिकाणी यश मिळाले आहे. तर काँग्रेसने 2 तर ‘आप’च्या एका उमेदवाराने विजय मिळविला आहे.
गांधीनगर महापालिकेसाठी रविवारी 56.24 टक्के मतदान झाले होते. यंदा तेथे त्रिकोणी लढत होती. भाजप आणि काँग्रेससह 40 जागांवर ‘आप’ने निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत बसपने 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि अन्य पक्षांचे 6 तसेच 11 अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. यापूर्वी सूरत महापालिका निवडणुकीत ‘आप’ला 27 जागांवर यश मिळाले होते.
भाजपकडून जल्लोष
गांधीनगर निवडणुकीत भाजपने प्रारंभीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. मंगळवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होताच भाजप समर्थकांनी जल्लोषास प्रारंभ केला होता. गांधीनगरमध्ये भगवा रंग उधळून आणि घोषणांसह भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला आहे.
भाजपचा बालेकिल्ला
गांधीनगरच्या मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेसने चुरशीची लढत दिली होती. तेव्हा भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 16 जागांवर यश मिळाले होते. पण काँग्रेसच्या एका नगरसेवकाने पक्षांतर केल्याने भाजपला सत्ता मिळविता आली होती. गांधीनगर हा भाजपला बालेकिल्ला मानला जातो. लालकृष्ण अडवाणींपासून अमित शाह देखील येथील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत राहिले आहेत.
अन्यत्रही भाजपची सरशी
अहमदाबाद महापालिका पोटनिवडणुकीत भाजपने दोन्ही जागांवर यश मिळविले. तर ओखा नगरपालिकेत भाजपला 34 आणि काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळविला आहे. बनासकांठा नगरपालिका निवडणुकीत 24 पैकी 20 जागांवर भाजपने यश मिळविले आहे. तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची कामगिरी केवळ भानवड नगरपालिकेत चांगली राहिली आहे. तेथे पक्षाने 24 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपला केवळ 8 जागा जिंकता आल्या आहेत.