कन्नड फलक लावल्यास दुकान मालकांच्या तोंडाला काळे फासू – राजू यादव
उचगाव / वार्ताहर
कन्नडीकांनी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख यांच्या वाहनावर केलेला भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या फलकाची तोडफोड, तसेच मराठी भाषिकांच्या दुकानावरील मराठी फलकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ गांधीनगर (ता.करवीर ) येथील व्यापारपेठेतील कन्नड फलकांना काळे फासून कन्नडीकांना जशास तसे उत्तर करवीर शिवसेनेच्यावतीने देण्यात आले. यापुढे कन्नड फलक लावले तर दुकान मालकांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी यावेळी दिला.
शिवसैनिकांच्या या आंदोलनाच्या दणक्याने इतर व्यवसायिकांनी तात्काळ आपले कानडी फलक उतरून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. यावेळी “कन्नडीकांचा धिक्कार असो”,”कर्नाटकातील सरकारचा निषेध असो” या घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच पोलिसांनीही तात्काळ असे कन्नड फलक उतरवण्याच्या नोटीसा संबंधित व्यावसायिकांना बजावाव्यात अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस व व्यापारी जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, युवासेनेचे सागर पाटील, संतोष चौगुले, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, वीरेंद्र भोपळे, खेताजी राठोड, बाबुराव पाटील, शिवाजी लोहार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.