प्रतिनिधी/ मडगाव
गांधी मार्केट विक्रेते संघटनेचे नेते असलेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी सकाळी आपल्या पाजीफोंड येथील निवासस्थांनी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर, पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी गांधी मार्केटमधील फळ-भाजी विक्रेत्यांना फातोर्डातील रवींद्र भवन रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटून व्यवसाय करू देण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती आजगावकर यांनी दिली.
मडगावातील लोहिया मैदान व पोलीस स्थानकासमोरील जुना बस स्थानक या जागांवर यावेळी विचार करण्यात आला होता. मात्र रवींद्र भवन रस्त्यावर अंतर ठेवून दुकाने लावणे तसेच पार्किंगसाठी स्टेडियमची जागा वापरणे शक्य होणार असल्याने ती जागा निश्चित करण्यात आल्याचे आजगावकर यांनी सांगितले.
मडगाव शहरातही सोय करण्याची मागणी
फातोर्डात आधीच फलोत्पादन महामंडळाचे कित्येक गाळे असून मडगावात त्या तुलनेत कमी गाळे आहेत. त्यातच गांधी मार्केटातील विक्रेत्यांना रवींद्र भवन रस्त्यावर बसविल्यास त्यातून मडगाववासियांची काय सोय होईल असे आजगावकर यांना विचारले असता फातोर्डातील सदर जागा मुख्याधिकाऱयांनी सूचित केली असल्याचे त्यांनी सांगितले. लोहिया मैदान व जुने बसस्थानक येथे गर्दी होईल यासाठी त्या जागा निवडण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात आले. मात्र लोहिया मैदान, जुने बसस्थानक वा पिकअप स्थानक अशा शहरी भागातील तिन्ही ठिकाणी किमान एका फळ-भाजी विक्रेत्याला लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी मडगाववासियांकडून करण्यात येत आहे.
गांधी मार्केटमध्ये गुरुवारपासून पुन्हा पहाटे फळ-भाज्या घेऊन ट्रक येणार आहेत. ते घाऊक विक्रेत्यांना माल वितरित करणार, त्यानंतर किरकोळ विक्रेते त्यांच्याकडून माल घेऊन तो रवींद्र भवन मार्गावर नेऊन विक्री करणार, अशी माहिती आजगावकर यांनी दिली. यावेळी लोकांना गांधी मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
41 margao 2