पालिका बैठकीत ठराव मंजूर : नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील गांधी मार्केट तसेच सभोवतील भागांत पेव्हर्स बसविणे व अन्य विकासकामे मिळून सुमारे 21 लाख रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर करून घेतल्याची माहिती प्रभाग 14 च्या नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी दिली.
गांधी मार्केटमधील फळ-भाजी बाजाराचा प्रवेश मार्ग तसेच गोमांस संकुलाच्या समोरील पार्किंगच्या जागेत हे पेव्हर्स बसविण्यात येणार आहेत. या विकासकामांचा अंदाजित खर्च 21.50 लाख रु. आहे. याखेरीज गोमांस संकुलाच्या मागील जागेत तसेच जाफर बेपारी यांच्या घरासमोरील जुना वीजबत्ती खांब बदलून नवीन खांब उभारून वीजबत्तीची सोय केली जाणार असल्याचे डॉ. आजगावकर यांनी नजरेस आणून दिले.
गांधी मार्केट येथील पाच घरांना सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या अंतर्गत सुलभ शौचालये उभारण्यासाठी या बैठकीत आपण ठराव मंजूर करून घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. पालिकेकडून सदर विकासकामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग 14 मधील अन्य भागांतील आवश्यक ठिकाणी विकासकामे राबविण्यासाठी आपण नोंदी घेतल्या आहेत. त्यासंदर्भातील अंदाजित खर्च तयार करणे पालिकेला शक्मय नसल्यास खासदार निधीतून अथवा सार्वजनिक बांधकाम खाते वा अन्य अधिकारिणींकडून करून घेण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. आजगावकर यांनी सांगितले.