मारहाणीच्या घटनेशी देणेघेणे नसल्याची भूमिका- उत्तरप्रदेश पोलीस दुसऱयांदा नोटीस बजावणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये मुस्लीम वृद्धाला मारहाण आणि गैरवर्तनाप्रकणी ट्विटरने पोलिसांच्या नोटीसवर भूमिका मांडली आहे. वादाशी आमचे कुठलेच देणेघेणे नाही, आम्ही अशा मुद्दय़ांना हाताळत नसल्याचे ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांनी म्हटले आहे.
7 दिवसांच्या आत लोनी बॉर्डर पोलीस स्थानकात उपस्थित राहून वक्तव्य नेंदविण्याप्रकरणी बोलताना माहेश्वरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडला जाऊ शकतो असे सांगितले आहे. परंतु पोलीस या स्पष्टीकरणावर संतुष्ट नसल्याने ट्विटरला पुन्हा नोटीस बजावू शकतात.
यापूर्वी गाझियाबाद पोलिसांनी 17 जून रोजी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक माहेश्वरी यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. पोलिसांनी त्यांना 7 दिवसांच्या आत पोली स्थानकात उपस्थित होत वक्तव्य नोंदविण्यास सांगितले होते.
ट्विटर कम्युनिकेशन इंडिया आणि ट्विटर आयएनसीद्वारे काही लोकांनी स्वतःच्या ट्विटर हॅँडलचा वापर करत समाजात द्वेष फैलावण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न रोखण्यासाठी कंपनीकडून कुठलीच पावले उचलण्यात आली नाहीत. अशा समाजविरोधी संदेशांना सातत्याने व्हायरल होऊ दिले गेले असे नोटीसमध्ये म्हटले गेले होते.
गाझियाबाद पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ट्विटर इंडिया आणि न्यूज वेबसाइट ‘द वायर’ला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी काही पत्रकार आणि र्कांग्रेसच्या नेत्यांवर सांप्रदायिक अशांतता फैलावण्याच्या उद्देशाने चित्रफित प्रसारित करण्याचा आरोप आहे.
26 मेल्सवर उत्तर नाही
यापूर्वी गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरला मागील एक वर्षात सुमारे 26 मेल पाठविण्यात आले, यातील एकावरही उत्तर मिळाले नसल्याचे सांगितले होते. हे सर्व मेल 15 जून 2020 ते 15 जून 2021 दरम्यान पाठविण्यात आले होते. पोलिसांच्या डाटानुसार यादरम्यान फेसबुकला 255 मेल करण्यात आले, यातील केवळ 177 मेल्सवर प्रतिसाद मिळाला. अशाचप्रकारे इन्स्टाग्रामला पाठविण्यात आलेल्या 62 पैकी 41 आणि व्हॉट्सऍपला पाठविण्यात आलेल्या 58 मेलपैकी केवळ 28 वर उत्तर मिळाले आहे.
उत्तर देण्यास विलंब
या प्लॅटफॉर्म्सकडून मागविण्यात आलेल्या माहितींवर अत्यंत विलंबाने प्रतिसाद मिळत आहे. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रमावर उत्तर देण्यास 40 ते 60 दिवसांचा कालावधी घेतात. तर व्हॉट्सऍपकडून प्रतिसाद मिळण्यास 90 दिवस लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
ट्विटर आरोपीच्या पिंजऱयात
गाझियाबाद पोलिसांकडून मागणी करण्यात आल्यावरही आरोपींनी स्वतःचे ट्विट्स डिलीट न केल्याने धार्मिक तणाव वाढल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर ट्विटर इंडिया आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून संबंधित ट्विट हटविण्यासाठी कुठलीच पावले उचलण्यात आली नाहीत. या सर्वांच्या विरोधात भादंविचे कलम 153, 153-अ, 295-अ, 505, 120-ब आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.