ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूर सीमेसह राज्यात सर्वत्र शेतकरी आंदोलन थांबवण्याच्या सूचना उत्तर प्रदेश सरकारने दिल्या आहेत. त्यानंतर गाझीपूर बॉर्डर दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली आहे.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-24 आणि गाझीपूर सीमेवर येणारा आणि जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, एनएच-24, एनएच-9, रोड क्रमांक 56, 57 ए, कोंडली, पेपर मार्केट, टेल्को टी पॉईंट, ईडीएम मॉल, अक्षरधाम आणि निजामुद्दीन येथून वाहतूक वळवण्यात आली आहे.
सिंघू, मंगेश, सबोली, पियाउ मनियारी यांच्या सीमा बंद झाल्या असून, लामपूर, साफियाबाद, सिंघू स्कूल आणि पल्ला टोल खुला करण्यात आला आहे. डीएसआयडीसी नरेलाजवळील एनएच 44 वरून वाहतूक वळवण्यात आली. बाह्य रिंग रोड, जीटीके रोड आणि एनएच 44 मध्ये जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.