कंग्राळी खुर्द येथे कचरा गाडीचे उत्स्फूर्त स्वागत : गेल्या दोन महिन्यापासून घंटागाडीला प्रारंभ झाल्याने महिला वर्गात समाधान
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
देख, देख देख तू यहाँ, वहाँ ना फेक, देख पहिलेही बिमारी होगी सबका बुरा हाल, अरे तो क्या करे भैया, ‘गाडी वाला आया देखो घरसे कचरा निकालो’ या कचरा गाडीवरील प्रबोधन गाण्याने कंग्राळी खुर्द वासियांची सकाळ उजाडत आहे. येथील ग्रा. पं. ने हद्दीतील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांची साथीच्या रोगापासून सुटका व्हावी यासाठी दोन महिन्यापासून कचरा संकलनासाठी घंटा गाडीची व्यवस्था केली आहे. याला नागरिकांतून विशेषतः महिला वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून गावची झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. एकत्रित कुटुंबेही विभक्त झाली. शेती आणि गावठाण घरातील जमिनीची तुकडा पद्धतीत वाटणी केली. त्यामुळे उपनगरांची वाढ झाली. शिवाय परसातील गायरान घरांनी व्यापले. पाळीव जनावरे जागा आणि शेतीअभावी कमी झाली. जनावरांचे शेण आणि घरातील केरकचरा टाकण्यासाठी गायरांचा वापर करण्यात येत होता. तो आता बंद झाला आहे. त्या घरातील कचऱयाची जागा परिसरातील चौक, मोकळी जागा, गटारीने घेतली आहे. त्यामुळे कचऱयाची समस्या दिवसेंदिवस जटिल बनली आहे.
ग्राम विकास आघाडीत झाली बिघाड अन्…
कंग्राळी ग्रा. पं. ने ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून पाच वर्षापूर्वी कचरा संकलनासाठी घंटा गाडी सुरू केली होती. मात्र, ग्राम विकास आघाडीच्या खंबीर नेतृत्त्वाअभावी ग्राम विकास आघाडीत बिघाडी झाली आणि काही वर्षातच कचरा गाडी बंद झाली. त्यामुळे पुन्हा चौकाचौकात, मोकळय़ा जागेत, गटारीमध्ये नागरिक कचरा, घरातील टाकाऊ वस्तू टाकू लागले. साहजिकच दुर्गंधीचे साम्राज्य पसरत चालले. कचऱयाचे ढीग गटारीत टाकल्यामुळे पाण्याचा निचरा न होता ठिकठिकाणी घाण पाण्याची डबकी निर्माण होत होती. शिवाय चौकाचौकातील कचऱयाच्या ढिगामुळे भटकी कुत्री, डुकरे यांचा वावर वाढला. यामुळे चिकनगुनिया, डेंग्यूचे रुग्ण वाढले. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. यामध्ये काही लोकांचा बळी सुद्धा गेला.
कचरा गाडीचे स्वागत
ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी आपल्या सहकारी सदस्यांच्या मदतीने कचरा गाडीला सुरुवात केली आहे. यामुळे महिला वर्गातून कचरा गाडीचे उत्स्फूर्त स्वागत कण्यात येत आहे. कचरा गाडी गल्लीमधून एक दिवसाआड कचरा जमा करत आहे. त्यामुळे सर्वजण कचरा गाडीत टाकून परिसर स्वच्छ ठेवण्यास ग्रा. पं. ला चांगली साथ देत आहेत.
नागरिकांची कचरा महसूल देण्यास टाळाटाळ
कचरा गाडी सुरू केल्यानंतर प्रतीघर 50 रु. मासिक कचरापट्टी वसूल करण्यात येत आहे. याला बहुतांश ग्रामस्थ कचरापट्टी देऊन ग्राम पंचायतीला सहकार्य करत आहेत. परंतु काही लोक कचरापट्टी देण्यास विरोध करत जमा करणाऱयांचा अपमान करत आहेत. ही बाब वॉर्डामधील सदस्यांच्या कानावर घालून विचारणा केली असता तेही कचरापट्टी देत आहेत. परंतु त्यांच्या बेजबाबदार वागण्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कारण गावात कोणतीही योजना राबवायची असल्यास ती लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या सहकार्यातून तडीला न्यावयाची असते. यासाठी ग्रामस्थांनी आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावा व ग्रा. पं. ला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षासह सदस्यांनी केले आहे.
कचरावसुली जमा खर्च
जमा करण्यात येणारी कचरापट्टी आणि खर्च याचा पारदर्शकता व्यवहार सुरुवातीपासून ठेवण्यात आला आहे. यासाठी गावातील कोणत्याही व्यक्तीने हा हिशोब पाहावा असे आवाहन ग्रा. पं. अध्यक्षंनी केले आहे.
गृहिणींचा कचरा प्रश्न सुटला
ग्रा. पं. ने सुरू केलेली कचरा गाडी सकाळी येते. ओला आणि सुका दोन्ही कचरा घेऊन जाते. पूर्वी कचरा टाकण्यासाठी अर्धा कि.मी. जावे लागत होते. त्यामुळे इंधन आणि वेळ पण वाया जात होता. कचरा गाडी सुरू केल्याने गृहिणींचा प्रश्न सुटला आहे.
– मोहिनी संभाजी पाटील
कचरा समस्या झाली दूर
गाडीअभावी कचरा विल्हेवाट लावताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. शिवाय जुन्या घराकडे जाताना परिसरातील लोक वाटेवर रात्री अपरात्री कचरा टाकत होते ते आता बंद झाले आहे. आमचा परिसर स्वच्छ होत आहे.
-रेणुका श्रीधर बाळेकुंद्री
ग्रा. पं. ला सहकार्य करा
विशेषतः महिला वर्गाने दररोज सकाळी गाडीत कचरा टाकून ग्रा. पं. ला सहकार्य करावे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. ग्रा. पं. ने ठरवून दिलेली कचरापट्टी वेळेवर द्यावी.
– सदस्या कमला पाटील
कचरा अन्यत्र टाकल्यास कारवाई
कंग्राळी खुर्द गावच्या महिलांच्या आग्रहाखातर कचरा संकलनासाठी कचरा गाडीची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. गाडीशिवाय कचरा अन्यत्र टाकल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्रा. पं. अध्यक्षानी दिला आहे.
– ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील