ऑनलाईन टीम / पुणे :
गेल्या 42 वर्षांहून अधिक काळ गायनवादन आणि नृत्य या क्षेत्रात कार्यरत असलेल्या गानवर्धन संस्थेने देखील कोविड -19 च्या आवाहानाला सामोरे जात डिजीटल व्यासपीठाचा आधार घेत पहिल्या ऑनलाईन मैफलीचे आयोजन केले होते. गानवर्धनच्या युट्युब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सोमवार 17 ऑगस्ट पासून रसिकांसाना या ऑनलाईन मैफलीचा आनंद घेता येणार आहे.
यंदा कोविड-19 च्या कठीण परिस्थितीत नेहमीचे कार्यक्रम होत नसल्याने रसिकांची होणारी ही अडचण लक्षात घेता गानवर्धनतर्फे रसिकांना डिजीटल पद्धतीने कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचा पर्याय या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या पहिल्या ऑनलाईन कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर यांच्या गायनाने प्रारंभ झाला. त्यांना संवादिनीवर उपेंद्र सहस्त्रबुद्धे आणि तबल्यावर रोहित मुजुमदार यांनी साथसंगत केली. मेहेर यांनी सुरवातीला मीरा की मल्हार रागातील विलंबीत एकतालांत अरज सुनो —–हा ख्याल सादर केला. दोन धैवत, दोन निषाद आणि दोन गंधार असा हा मल्हार सादर करुन त्यांनी मैफलीत जीव ओतला. मीरा की मल्हार रागातच त्यांनी गायत्री देवीचे वर्णन करणारी ‘जगत जननी माता चंडी’ ही बंदीश सादर केली. या नंतर देस रागातील मनवा लरजे मोरा ही त्रितालांतील चीज सादर केली.
यानंतर झालेल्या सरोद वादनात रंग भरत सारंग कुळकर्णी यांनी राग बागेश्री सादर केला. विलंबित गत रुपक तालात बांधलेली होती. रुपकाच्या अंगाने केलेली लयकारी अप्रतिम होती. त्यानंतर त्यांनी दृत त्रितालांत एक वंदिश वाजवली. ही बंदिश रंगवतांना तबला आणि सरोद याची जुगलबंदी चांगलीच रंगली.
प्रसिद्ध गायिका रेवा नातू यांनी बहादुरी तोडीत राग घेतला. या रागांत त्यांनी महादेव हा ख्याल विलंबितत्रितालांत सादर केला. आज बलिहारी ही बंदिश त्यांनी त्रितालात सादर करुन कार्यक्रमाचा समारोप झाला.रेवा नातू यांना रोहित मुजुमदार यांनी तबल्यावर तर देवेंद्र देशपांडे यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली.