मालवण/प्रतिनिधी-
गाबित ज्ञातीतील समाजबांधवांना जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणा-या समस्या जाणून घेण्यासाठी मामासाहेब वरेरकर नाट्यगृह येथे सोमवार २५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गाबित ज्ञातीबांधवांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केले आहे.
मालवण तालुका गाबित कार्यकारिणीची सभा गाबित समाज नागरी पतसंस्था येथे पार पडली. यावेळी डॉ. कोळंबकर, गंगाराम आडकर, मिथुन मालंडकर, भाई कासवकर, अरविंद मोंडकर, नरेश हुले, दादा वाघ, पवनकुमार पराडकर, पूजा सरकारे, दीक्षा ढोके, गया ढोके आदी उपस्थित होते. गाबित ज्ञातीतील अनेक पालक आणि विद्यार्थी जातीच्या दाखल्यांबाबत आपली समस्या घेऊन गाबित कार्यकारिणी सदस्यांची भेट घेत असतात. अशा सर्व पालक व विद्यार्थ्यांना एकत्र आणून एकाचवेळी त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर पुढे मार्ग काढण्याच्या दृष्टीने २५ रोजीचे चर्चासत्र महत्वपूर्ण ठरेल. चर्चासत्रास मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना निमंत्रित करण्यात आले असून गाबित समाज जिल्हा कार्यकारिणी संघटक चंद्रशेखर उपरकर हेदेखील मार्गदर्शन करणार असल्याचे डॉ. कोळंबकर यांनी सांगितले.