प्रतिनिधी/ निपाणी
दुचाकीची ट्रक्टरला पाठीमागून धडक बसल्याने शिरगुप्पीचा युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 6.45 च्या सुमारास गायकवाडी येथे घडली. अमृत बाळाराम पाटील-म्हाकवे (वय 25, रा. शिरगुप्पी ता. निपाणी) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, दुचाकी (क्र. केए 23 2706) घेऊन अमृत म्हाकवे हा लिंगनूरहून निपाणीच्या दिशेने येत होता. यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून जाणाऱया ट्रक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये अमृत हा जागीच खाली कोसळल्याने त्याच्या डोक्यातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. अमृतच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
सदर घटनेची माहिती शिरगुप्पी गावात समजताच शोककळा पसरली. अमृत हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करीत होते. सदर मृतदेह विच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास फौजदार बी. एस. तळवार करीत आहेत.