वाहतूक निरीक्षक आनंद उपाध्ये यांचा अनोखा छंद
प्रतिनिधी / फोंडा
एखाद्या सर्जनशिल कलाकारामधील कला निसर्गातील कोणत्या घटकाच्या माध्यमातून व्यक्त होईल हे सांगता येणार नाही. माती, लाकूड, धातू, पाषाणी दगड यापासून तयार केलेल्या कलाकृती आत्तापर्यंत आपण पाहिल्या असतील. पण गायीच्या शेणापासून सुरेख व टिकाऊ कलाकृती तयार होऊ शकतात, असे सांगिल्यास कुणालाही नवल वाटेल. वाहतूक खात्यातील निरीक्षक आनंद विनायक उपाध्ये यांनी ही अनोखी कला जोपासली असून फोंडा येथे रविवारी भरलेल्या शेतकरी बाजार या प्रदर्शनात त्यांच्या या कलेचे अनेकांना दर्शन घडले.
आनंद उपाध्ये यांनी लावलेले विविध कलाकृतींचे हे प्रदर्शन या शेतकरी बाजाराचे आकर्षण ठरले होते. गाय ही कृषी संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक असून तिच्या शेणापासून तयार केलेल्या वस्तू हा कृषी प्रदर्शनाचा भाग बनू शकतो या विचाराने त्यांनी हे स्टॉल लावले होते. तसे पाहिल्यास गायीच्या शेणाला काहीच मोल नाही. पण एखादा प्रयोगशिल शेतकरी किंवा कलेची दृष्टी असलेला आनंद सारखा कलाकार त्याचे मोल जाणू शकतो, याची प्रचिती त्याने साकारलेल्या या कलाकृतींमधून येते. आनंद उपाध्ये हे पेशाने वाहतूक निरीक्षक असून सध्या धारबांदोडा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव फोंडय़ातील आर्ल केली. कृषी बागायती हा घराचा पूर्वापार व्यावसाय. घरी स्वतःची गुरेही आहेत. त्यामुळे गुरांचे महत्त्व ते जाणून आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात त्यांच्या मनात कल्पक असा हा विचार आला व त्यांनी शेणापासून कलाकृती तयार करायला सुरुवात केली. सुरुवात शिवलिंगाच्या कलाकृतीपासून झाली व पुढे एकाहून एक अशा सुरेख अशा कलाकृती त्यांच्या हातून घडत गेल्या. गणपती, विठ्ठल, श्रीराम, हनुमान या देवतांच्या प्रतिकृतींबरोबरच काही राष्ट्रीय पुरुषांच्या कलाकृतीही त्यांनी तयार केल्या.
शेण हे टिकाऊ नसल्याने त्यात घट्टपणा येण्यासाठी व या कलाकृती अधिकाधिक काळ टिकून राहण्यासाठी काही नैसर्गिक तेलांचा वापर त्यांनी केला. विशेष म्हणजे मातीच्या मूर्ती घडविताना जसे साचे तयार केले जातात, तसा एकही साचा तयार न करता केवळ हाताने त्यांनी या कलाकृती घडविल्या आहेत. त्यांच्या संग्रहात सध्या अशा पंधरा ते वीस कलाकृती असून त्या सर्व एकाच गायीच्या शेणापासून बनविल्याचे उपाध्ये सांगतात. या सर्व कलाकृती इकोप्रेन्ड्ली असून त्या विकून पैसा कमावण्याचा त्यांचा अजिबात हेतू नाही. कलेविषयी उपजत असलेली आवड व गायीविषयी समाजात एक सकारात्मक संदेश जावा हा या उपक्रमागील उद्देश असल्याचे ते सांगतात. गायीच्या शेणाचा असाही वापर होऊ शकतो हे कळल्यास रस्त्यावरील भटक्या गुरांची शेतकरी काळजी घेतील हा त्यामागील त्यांचा विचार आहे. उपाध्ये यांनी कलेविषयी कुठलेही व्यावसायिक शिक्षण घेतलेले नाही. निव्वळ छंद म्हणून सुट्टीच्या दिवशी किंवा सकाळी लवकर उठून ते कलाकृती घडविण्यासाठी बसतात. आत्तापर्यंत त्यांनी ज्या पंधरावीस कलाकृती तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये एक सुरेख अशी श्रीरामांची मूर्ती आहे. त्या मूर्तीसाठी एक मोठा व आकर्षक देव्हारा बनविण्याचे काम सध्या ते करीत आहेत.