गाय किंवा कोणत्याही जनावराच्या शेणापासून खत तयार करता येते. एवढी माहिती प्रत्येकाला असते. तथापि, या साधनांचा उपयोग घरबांधणीसाठीसुद्धा होऊ शकेल, असा विचार केवळ प्रतिभावंतांनाच सुचतो. हरियाणातील शिवदर्शन मलिक यांना ही कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात त्यांनी उतरवूनही दाखविली.
शिवदर्शन मलिक गेल्या पाच वर्षांपासून गायीच्या शेणापासून सिमेंट, विटा आणि रंग यांची निर्मिती करतात. या मालाची ते ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विक्रीही करतात आणि त्यातून त्यांची वार्षिक उलाढाल आता 50 ते 60 लाख रुपयांवर पोहोचली आहे. घरबांधणीसाठी शेणाचा वापर ही कल्पना त्यांना एका विदेशी पर्यावरणस्नेही घराची माहिती मिळाल्यानंतर सुचली.
गायीच्या शेणावर प्रयोग करत त्यांनी त्यात जिप्सम, चिकनमाती आणि विशिष्ट प्रकारचा डिंक तसेच वनस्पतींचे चूर्ण विशिष्ट प्रमाणात मिसळून सिमेंटची निर्मिती केली. हे सिमेंट मजबुतीच्या दृष्टीने कुठेही कमी नाही, असा त्यांचा दावा आहे. अशाच प्रकारे त्यांनी विटा आणि रंगही बनविले असून ते रासायनिक साधनांपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनुकूल असल्याचा त्यांचा दावा आहे.TAR