केळकर बागेतील प्रकार,रेबीज झाल्याने मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
भूकेल्या गाभण गायीने शुक्रवारी केळकर बागेमध्ये चांगलाच गोंधळ घालून नागरिकांना सळोकीपळो करुन सोडले. महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांनी तिला पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथे तिला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिला गोशाळेत न ठेवता स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र दुपारी दुर्दैवाने या गायीचा मृत्यू झाला.
सकाळपासूनच ही गाय दत्त मंदिरानजीक असणाऱया विद्युत खांबाला ढुशा मारत होती आणि आजुबाजूने जाणाऱया नागरिकांच्या अंगावर धावून जात होती. प्रारंभी थोडा वेळाने गाय निघून जाईल, असा अंदाज नागरिकांना होता. परंतु गायीने चांगले सात ते आठ तास सर्वांनाच हैराण केले.
या एकूण प्रकारामुळे या ठिकाणी अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत आला होता. कोरोना काळामध्ये जनावरांचे हाल झाले हे तर उघडच आहे. अनेक जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला. ही गाय गाभण असल्याने तिला पोटभर अन्न मिळाले नसल्याने ती बिथरली आहे, अशी चर्चा सुरू झाली.
साधारण 12 वाजल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या गायीला हाताळेपर्यंत त्यांच्या नाकीनऊ आले. त्यांनी तिला इंजेक्शन देवून पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रेबीजचा अंदाज व्यक्त करून तिला गो शाळेत नेऊ नका अशी सूचना केली. त्यामुळे तिची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे ठरले. दरम्यान वाहनामध्येच त्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही गाय नेमकी कोणाची हे कळत नसल्याने कर्मचाऱयांनी तिला गोशाळेत पाठविले. दरम्यान एक वृद्धा आपली गाय अशी कशी बिथरली म्हणून हंबरडाही फोडत होती. त्यामुळे एकूणच याबाबत उलटसुलट चर्चा सुरू राहिल्या.