पिंपळगाव / वार्ताहर
गेली तीन दिवसांपासून भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात धुडगूस घालणाऱ्या टस्कर हत्तीचे आज दुपारी गारगोटी -पिंपळगाव रस्त्यानजीक मांगनूर (ता.कागल )येथील जांबळीच्या शिवारात दर्शन झाले. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
मंगळवारी रात्री दिंडेवाडीच्या शिवारात असलेला टस्कर बुधवारी सकाळी पिंपळगाव -गारगोटी रस्ता पार करून चिकोत्रा नदीकाठी गेल्याचे दिसून आले .त्यानंतर तो पुन्हा दुपारी रस्ता पार करून बामणे -नागणवाडीच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. आज सकाळी बारवे पैकी इंगळेवाडी येथील शिवारात त्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. आज दुपारी मांगनूरजवळ जांभळी पानंदी नजीकच्या ऊसात त्याचे दर्शन झाले.
गेली चार दिवसांपासून पिंपळगाव खोऱ्यात या टस्करने मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत ऊस पिकांचे नुकसान केले आहे. ऐन सुगीच्या दिवसातच हत्ती शिवारात दाखल झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित असून हत्तीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.