पारा 17.9 डि.सें.पर्यंत खाली
प्रतिनिधी /पणजी
रविवारी रात्री गोव्यातील पारा बराच खाली उतरला. यंदाच्या वर्षातील तो आतापर्यंतचा सर्वात कमी पारा ठरला. सोमवारी पहाटे हा पारा 17.9 डि. से. पर्यंत खाली आला. गोव्यात सर्वत्रच कडाक्याच्या थंडीचा मौसम सुरू आहे.
गेले तीन दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी सुरु आहे. पारा 20 डि. से. पर्यंत होता. मात्र सोमवारी पहाटे एवढी कडक थंडी होती की, पारा 17.9 डि. से. पर्यंत खाली आला. पणजी वेधशाळेत त्याची नोंद झाली.
सत्तरी, धारबांदोडा व सांगेमध्ये पारा या पेक्षाही खाली उतरलेला आहे. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार किमान तापमान आणखी काही दिवस तसेच राहू शकते. कमाल तापमान हे पणजीत 32 डि. से. एवढे होते.
नियमित व सरासरी तापमानाच्या तुलनेत किमान तापमानात 4.5 डि. से. ने घट झाली. त्यामुळे रविवारी उत्तर रात्री गोवा अक्षरशः गारठला. राज्यात पडणारी थंडी काजू, आंबा व फणस पिकासाठी उपयुक्त ठरणारी आहे. गोव्यातील अनेक भागात आम्रवृक्षाला बहर येण्यास प्रारंभ झाला आहे.